कृषीवलच्या दणक्याने आमदार वठणीवर

थळमध्ये पाणीपुरवठा सुरु; ग्रामस्थांनी मानले आभार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
थळ प्रभाग 4 मध्ये गेले कित्येक दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत होती. अनेकदा तक्रारी करुनही आमदारांसह ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा प्रशासनही दाद देत नसल्यामुळे ग्रामस्थांनी आपली व्यथा कृषीवलसमोर मांडली. याबाबत कृषीवलने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जाग आलेल्या निष्क्रीय आमदारांनी सुत्र हलवित पाणी सुरु करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाणी सुरु केले. कृषीवलच्या दणक्यामुळे गावात पाणी आल्याने दिलासा मिळालेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत कृषीवलला धन्यवाद दिले. मात्र प्रत्येकवेळी कृषीवलने झोडपल्यावरच पाणी येते आणि काही दिवसांत पुन्हा बंद केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गेेली अडीच वर्षे तालुक्यातील सर्वात श्रीमंत असणार्‍या थळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील थळ बाजार येथील प्रभाग क्रमांक 4 मधील ग्रामस्थ कृत्रीम पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. पाणी मिळावे या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार केले. मोर्चे काढले; मात्र विकासाचा फक्त गाजावाजाच करणार्‍या आमदारांना आपल्याच गावातील अडीच हजार ग्रामस्थांना पाणी देता आले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सतत झगडत असणारे ग्रामस्थ हतबल झाले. गावात पिण्याच्या पाण्याच्या दोन लाईन आहेत. मात्र एकाही पाईप लाईनला पाणी येत नाही.

ऐन गणेशोत्सवात देखील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामारे जावे लागले. पाणी टंचाईमुळे गावाबाहेर मुंबई, पुण्यात असणारे ग्रामस्थ सणासुदीला देखील गावात येणे टाळतात. एवढी वाईट अवस्था पाणी टंचाईमुळे ओढवली आहे. मात्र फक्त आश्‍वासना व्यतिरिक्त आमदारांनी आतापर्यंत काहीच केले नाही. पाण्यासाठी ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. गेल्यावर्षी पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

कृषीवलच्या टिमने सोमवारी गावात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या. त्यानुसार कृषीवलच्या माध्यमातून समस्येवर प्रकाश टाकला. याचे वृत्त प्रसिद्ध होताच मंगळवारी ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा झाला. कित्येक दिवसांनी पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत कृषीवलला धन्यवाद दिले.

कृषीवलने वारंवार पाणी टंचाईविरोधात आवाज उठविला आहे. कृषीवलने झोडपल्यावर मात्र दुसर्‍याच दिवशी पाणी येते असे ग्रामस्थ सांगतात. मात्र पुन्हा पाणी बंदही केले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बातम्या आल्यावर जर पाणी येत असेल याचा अर्थ पाणी पुरवठयाबाबत कोणतीच समस्या नाही. समस्या आहे, ती नियोजनात. त्यामुळे थळ ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन केले तर पाणी पुरवठा सतत सुरळीत राहू शकेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

आज आलं, उद्याचं काय?
कृषीवलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर थळमध्ये मंगळवारी (दि.11) पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. अनेक दिवसांनी घरात पाणी आल्याने महिलांनी कृषीवलचे आवर्जून आभार मानले. मात्र आज आलं, पण उद्याचं काय? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे उद्या पाणी येणार की, नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version