। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ऐन गणेशोत्सवात पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या अलिबाग तालुक्यातील तब्बल 21 गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नरमलेल्या एमआयडीसीने तात्काळ युद्ध पातळीवर कार्यवाही करीत अवघ्या काही तासातच पाणी पुरवठा सुरळीत केला. शेकापच्या आक्रमक भूमिकेचे स्वागत करीत 21 गावातील ग्रामस्थांनी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांना धन्यवाद दिले.

अलिबाग तालुक्यातील चेंढरे, वेश्वी, कुरुळ, बेलकडे, आक्षी, ढवर, कावीर, बामणगाव, खानाव या दहा ग्रामपंचायत हद्दीतील चेंढरे, वेश्वी, गोंधळपाडा, कुरुळ, बेलकडे, ढवर, नवेदर बेली, सहाण, सहाणगोठी, सहाण आदीवासीवाडी, सहाण ठाकूरवाडी, कावीर, गरुडपाडा, बोरपाडा, खारीकपाडा, तळ, बामणगाव, कुंठयाची गोठी, वढाव खुर्द, वढाव बुद्रूक या 21 गावांना एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अपुर्या पाणी पुरवठयामुळे या गावातील हजारो ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागत होते.
31 ऑगस्ट त्रपासून गणेशोत्सव सुरु झाल्यानंतरही गावांना पाणी पुरवठाच होत नसल्याने शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांची भेट घेतली.
यावेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संतापाचा कडेलोट झाल्याने शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, संजय पाटील, अनिल पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले. शेकापच्या आक्रमक पावित्र्यामुळे अधिकार्यांनी नमते घेत तात्काळ अडचणी दुर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले. त्यानुसार तात्काळ कार्यवाही करीत युद्धपातळीवर सूत्रे हलवित अवघ्या चार तासातच पाणी पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे ग्रामस्थ विशेष करून महिला ग्रामस्थांनी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यासह संजय पाटील, अनिल पाटील यांना धन्यवाद दिले.