कृषीवल इम्पॅक्ट: वसतीगृहातील मुलींच्या ताटात परिपूर्ण जेवण

शेकापच्या पाठ पुराव्याला आले यश; मुलींनी मानले शेकापचे आभार

| रायगड | खास प्रतिनिधी |

सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यींनींच्या जेवणाच्या ताटामध्ये डाळ, भात, भाजी, चपाती, पापड, कोशिंबीर असे परिपूर्ण जेवण मिळू लागले आहे. कृषीवलने याबाबतचा पाठपुरवा करत ‘वसतीगृहातील मुली उपाशी..’ या मथळ्याखाली 30 जुलै रोजी वृत्त प्रसिध्द करत समाज कल्याण विभागाला चांगलाच दणका दिला होता.

शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कृषीवलच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाला धारेवर धरले होते. त्यानंतर समाज कल्याण विभागाने आपल्या कामात सुधारणा केली. मुलींना आता चांगल्या प्रतिचे अन्न खायला मिळत आहे. चित्रलेखा पाटील आणि कृषीवलने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे वसतीगृहातील विद्यार्थ्यांनींनी आभार मानले आहेत. समाजातील कष्टकरी, शेतकरी, कामगार, दबलेल्यांचा आवाज उठवण्यासाठी शेकाप आणि कृषीवल नेहमीच अग्रेसर राहीले आहे. यापुढेही त्यांनी असाच न्याय मिळवून देण्याचे कार्य करावे, अशी भावना विद्यार्थींनींनी व्यक्त केली.

गरीब, आर्थिक दृष्ट्‌‍या दुर्बल असणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहे. शिक्षण घेत असताना त्यांना राहण्याची, खाण्याची अबाळ होऊ नये यासाठी मुलींसाठी राज्याच्या विविध भागांमध्ये वसतीगृह उभारण्यात आले आहेत. अलिबाग येथील वसतीगृहामध्ये मात्र मुलींच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच तेथील वॉर्डन वसतीगृहात मुलींसोबत राहात नव्हत्या. असा गंभीर प्रकार चित्रलेखा पाटील यांच्या निर्दशनास आल्यावर त्यांनी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांना चांगलेच धारेवर धरले होते. मुलींच्या वसतीगृहाचा खर्च सरकार सर्वमान्यांच्या करातून करते. त्यामुळे त्यांना नियमानुसार सर्व सोयी सुविधा मिळाल्याच पाहीजेत, तसे होत नसेल तर या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचा सज्जड दम जाधव यांना दिला होता.

त्यानंतर परिस्थितीचे गांभिर्य ओळखत जाधव यांनी त्यामध्ये तातडीने सुधारणा केली. आज वसतीगृहातील मुलींना स्वच्छ आणि पोषक अन्न देण्यात येत आहे. तसेच वॉर्डन आपले कर्तव्य पार पाडत आहे.

शेकाप आणि कृषीवल हे समाजातील सर्वच घटकातील प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम करत आहे. सरकार आणि प्रशासनाला वेसण घालण्याचे काम आमच्याकडून असेच अविरतपणे सुरुच राहील.

चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख
Exit mobile version