। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
भारतीय खेल प्राधिकरणच्यावतीने फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी लखनऊ येथे मंगळवारी (दि.7) संपन्न झाली. या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेल प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणार्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला होता. या आयोजनातून अंतिमतः 12 महिला कुस्तीपटू निवडण्यात आले असून त्याना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठविण्यात येणार आहे. अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू क्षितिजा जगदीश मरागजे हिने 50 ते 54 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
क्षितिजा ही कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे सराव करत असताना खेल प्राधिकरणाच्या एसएआय कांदिवली (मुंबई) येथे सराव केंद्रात तीची निवड झाली होती आणि तेथूनच आता तीची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाली.
यावेळी प्रशिक्षक राजाराम कुंभार, महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांजळे, विजय चव्हाण, दिवेश पालांडे, ओमकार निंबळे, रोशनी परदेशी आणि लीली पॉल आणि डॉ. सुनील पाटील यांनी क्षितिजा शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पै मारुती आडकर, खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर यांनी क्षितिजाचे विशेष कौतुक केले आहे.