जगबुडी नदीपात्रात कोसळणारा कुडपणचा धबधबा

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्‍वर म्हणून सर्वपरिचित मात्र, इंग्रजांनी अविकसित ठेवलेले हिलस्टेशन आजतागायत अविकसितच राहिले आहे. भरदिवसा आकाशातील ढगांमध्ये वावरत असल्याचा आभास निर्माण व्हावा, असे येथील सृष्टीसौंदर्य असून, या कुडपणमध्ये भीमाची काठी हा सुळका आश्‍चर्यचकित करणारा हवेतील बेटासारखा भूभाग आहे.

कुडपण खुर्दमध्ये भराडी नदी, भुतरान नदी आणि आवेरी नदी अशा तीन नद्यांचा संगम भराडी नदीसमोरील औदुंबराच्या वृक्षापासून जवळच्या पात्रात होऊन पुढे हे पात्र धबधब्यापासून हजारो फूट दरीमध्ये खोल कोसळून तयार होणारे पात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण तालुक्यांतून वाहणारी जगबुडी नदी म्हणून ओळखले जात आहे. अलीकडेच कुडपण खुर्द आणि कुडपण बुद्रुकदरम्यान एका कड्याजवळ एक पेव्हर ब्लॉकचा रॅम्प तयार करण्यात आला असून, याठिकाणाहून या धबधब्यासह भीमाच्या काठीचे विलोभनीय दर्शन घडत आहे.

कसे जाल?- पोलादपूर येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून अर्धा कि.मी. अंतरावरील चोळई नदीवरील दि लेप्रसी मिशन ऑफ इंडियाच्या लेप्रसी हॉस्पिटललगतच्या कोतवाल रस्त्याकडे जाणार्‍या फाट्यावरून देवपूरच्या पुढे गोळेगणी परसुले येथून क्षेत्रपाळपर्यंत जाऊन तेथून आमलेवाडी, कुडपण बुद्रुक, कुडपण खुर्द व शेलारांचे कुडपण याठिकाणी वर्षापर्यटनासाठी अवश्य जावे. सोबत चहा, पाणी, खाद्यपदार्थ, आधाराची काठी, टॉवेल, फोटोग्राफीची आवड असल्यास कॅमेरा अथवा मोबाईल फोन सोबत न्यावे.

Exit mobile version