सचिन घाडी यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार


| सोगांव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. आद्य शिक्षिका, कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त भाई जगताप मित्रमंडळ रायगड, काँग्रेस सेवा फाऊंडेशन रायगड, मधूशेठ ठाकुर चॅरिटेबल ट्रस्ट रायगड यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 3 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सातिर्जे मैदान, अलिबाग-रायगड येथे सायंकाळी 5:30 वाजता युवक मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. घाडी यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रात कार्यरत राहून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्याच्या कार्याची दखल घेत त्यांची कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2024 साठी निवड केली आहे. तसे पत्र संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. उमेश ठाकूर यांच्यावतीने त्यांना देण्यात येणार आहे. याबद्दल यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Exit mobile version