ठाणे ग्रामीण कुमार व पालघर संघ कुमारी विभागात विजेता ठरला
| पुणे | प्रतिनिधी |
ठाणे ग्रामीण व पालघर या संघानी अनुक्रमे 52व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कुमार व कुमारी गटाचे विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएसशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली पिंपरी चिंचवड बोपखेल येथील दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे व राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ही आमदार चषक कबड्डी स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रात्री उशीरा झालेल्या मुलांच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात ठाणे ग्रामीण संघाने अहमदनगरचा संघाचा 39-37 अशा गुण फरकाने पराभव करून स्व. प्रभाकर नागो पाटील फिरता चषका बरोबर आमदार चषक पटकाविला.
मध्यंतरला ठाणे ग्रामीण 16-22असा 6गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, मध्यंतरानंतर जीतसिंग सैनी व स्मित पाटील यांनी जोरदार आक्रमण करीत अहमदनगरच्या अभिजित साळुंखेचा व सार्थक शिंदेचा बचाव भेदला. त्यामुळे मध्यंतरानंतर सामना ठाणे ग्रामीणच्या बाजुला झुकविण्यात त्यांना यश आले. ठाणे ग्रामीणच्या समन हरिजन याने सुरेख पकडी घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात हात भार लावला.
कुमारी विभागात पालघरच्या संजना भोईर व हनी सोलमुत्तू यांच्या वेगवान चढाया व काजल भोईरने केलेल्या पकडींमुळे पिंपरी चिंचवड संघाचा 53- 45 असा पराभव करीत स्व. चंदन सदाशिव पांडे फिरता चषक व आमदार चषक पहिल्यांदा पटकाविला. मध्यंतराला पालघर संघाकडे 31-20 अशी आघाडी होती. सामन्याच्या पुर्वार्धातच संजना भोईर हिने जबरदस्त आक्रमण करीत पिंपरी चिंचवड संघावर दोन लोन लावत आपले ईरादे स्पष्ट केले. तीने निडरपणे खेळ करीत पिंपरी चिंचवडच्या सिध्दी गायकवाड व नम्रता सावंत यांचा बचाव भेदत आपल्या संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. ही आघाडी उत्तरार्धात ही कायम राखत हा सामना जिंकला. पिंपरी चिंचवडच्या संतोषी थोरवे व किर्ती कडगंची यांनी वारंवार पालघरचा बचाब भेदण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात त्यांना यश न आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पिंपरी चिंचवडच्या सिध्दी गायकवाडने पकडी घेतल्या. तत्पुर्वा झालेल्या कुमारी विभागात उपांत्य सामन्यात पालघर संघाने सांगली संघाचा 44-23 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर पिंपरी चिंचवड संघाने गतविजेत्या पुणे ग्रामीण संघाचा 48-43 असा अनपेक्षित पराभव केला.
कुमार विभागात अहमदनगर संघाने परभणी संघाचा 51-50 असा अवघ्या एक गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर ठाणे ग्रामीण संघाने पुणे ग्रामीण संघाचा 37-36 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.स्पर्धेचे पारितोषिक वितरण विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्पर्धा आयोजक शशिकांत घुले, दिनेश धावडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे, मालोजी भोसले, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, हिरीबाई घुले, निलेश पांढरकर, छत्रपती पुरस्कार प्राप्त राजू घुले, राकेश भाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.







