नारायण राणेंचा दावा
| मुंबई | प्रतिनिधी |
सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत आपली भूमिका मांडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण समाप्त केले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो, असेही ते म्हणाले.
सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी जरांगे पाटील यांची होती. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारने महिन्याभराचा कालावधी दिला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय पूर्वीही झाला होता. अनेकांनी आरक्षणाबाबत टीकाही केली, असं नारायण राणे म्हणाले.
सरसकट दाखले करू नका. राज्य सरकारने घटनेतील 15/4 चा अभ्यास करावा. सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. राज्यात 38 टक्के मराठा समाज आहे जो गरीब आहेत, त्यांना आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजातील वर्गाला आरक्षण द्यावे पण कुणाचेही आरक्षण काढून हे आरक्षण देऊ नये, असेही नारायण राणेंनी नमूद केले. घटनेने तरतूद केल्याप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. ज्याला इतिहासाची जाण आहे त्यानेच या विषयावर बोलावं. यापूर्वी जी आरक्षण देण्यात आली तेव्हा मराठेच मुख्यमंत्री होते. मराठा आरक्षण देताना द्वेषाची भावना असू नये, अशी अपेक्षा नारायण राणेंनी व्यक्त केली.