रायगडातील सर्वात मोठी भव्यदिव्य स्पर्धा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्टस् अकॅडमी आयोजित अलिबाग, मुरूड व रोहा तालुका मर्यादित दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा पाहण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पाच दिवस होणार्या या स्पर्धेचा थरार बुधवारी (दि.19) फेब्रुवारीपासून होणार आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही स्पर्धा कुरुळ येथील आझाद मैदानात सुरू होणार आहे.
आयपीएलच्या धर्तीवर स्थानिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, यू.व्ही. स्पोर्टस् अकॅडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने गतवर्षी पीएनपी चषक ही दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. लाखोंच्या संख्येने प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले होते. एक वेगळा जल्लोष निर्माण झाला होता. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होता. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक असे सर्वचजण आपली खिळाडूवृत्ती दाखवत होता. भव्यदिव्य अशा प्रेक्षक गॅलरीत बसून आणि युट्यूबर घरबसल्या ही स्पर्धा पाहण्याची संधी प्रेक्षकांसह क्रीडाप्रेमींना मिळाली. क्रिकेट खेळाडूंसह क्रीडाप्रेमींचा उत्साह लक्षात घेत नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांनी पुन्हा पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. पीएनपी चषकाचे हे दुसरे पर्व असून, बुधवार (दि.19) ते रविवार (दि.23) या कालावधीत होणार्या क्रिकेटचा थरार क्रीडाप्रेमींना पहावयास मिळणार आहे. अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील 24 संघांमध्ये लढत होणार आहे.
आकर्षक बक्षिसे
या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला पाच लाख रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला तीन लाख रुपये व आकर्षक चषक, तर, तृतीय क्रमांक पटकाविणार्या संघाला दोन लाख रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तीन आकर्षक दुचाकी व इतर विविध आकर्षक बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात येणार आहेत.