तालवाद्य स्पर्धेत प्रथम, तर लोकनृत्यात तृतीय क्रमांक
विद्यार्थ्यांनी गाजवला रायगड दक्षिण विभाग
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबई विद्यापीठाच्या 59 व्या युवा महोत्सवात लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोंढीच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तालवाद्य स्पर्धेत आकाश पाटील याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली, तर लोकनृत्य स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
मुंबई विद्यापीठांतर्गत प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी, वेश्वी-अलिबाग येथे 59वा युवा महोत्सव उत्साहात पार पडला. रायगड दक्षिण विभागातील या स्पर्धेत तब्बल 22 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये एल.एस.पी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कलागुणांची छाप उमटवली.
तालवाद्य (पखवाज वादन) स्पर्धेत आकाश पाटील याने प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच लोकनृत्य ‘धुमाळी नाच’ स्पर्धेत तनुजा मुंडे, समीक्षा घरत, पायल सपकाळ, श्रुतिका दवणे, प्रिया शहा, राजेश वाघमारे, जयेश वाघमारे, नावीन्य वर्तक, नील अष्टमकर आणि प्रणल म्हात्रे यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र ठाकूर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्यवाह राजेंद्र ठाकूर, सहकार्यवाह जगन्नाथ पेढवी, खजिनदार राजेंद्र शिंदे, कायम सदस्य ॲड. प्रवीण ठाकूर, संचालक राजनभाई नार्वेकर, सुनील थळे, मनोहर म्हात्रे, किरण ठाकूर तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या लिना पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. दर्शना तोडणकर, प्रा. सचिन गोंधळी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
