। अलिबाग । शहर वार्ताहर ।
जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली-अलिबाग येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यशस्वी विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आहे. याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, नेहरु युवा केंद्र, रायगडचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, भारतीय लष्कर सेवेतील सोल्जर मयुरेश गावंड, आंतरराष्ट्रीय खेळाडू तपस्वी गोंधळी, महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव दीपक मोकल, कराटे परीक्षक योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर हे मान्यवर उपस्थित होते.
कोरोना विषयक आरोग्यनिर्बंधांचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला असून, यामधील मुलांसाठी 5 कि.मी. धावणे स्पर्धेत प्रणित गावंड याने प्रथम, धीरज पाटील याने द्वितीय,तर केतन वालेकर याने तृतीय क्रमांक पटकाविला. तर, मुलींसाठी 3 कि.मी. धावणे स्पर्धेत अमृता शेडगे हिने प्रथम, मनस्वी दवंडे द्वितीय, तर कथा वाडकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
मुलांसाठी 1600 मीटर धावणे स्पर्धेत सौरभ गोटूरे प्रथम, अक्षय पाटील द्वितीय, धीरज पाटील याने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींसाठी 800 मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम- खुशबू चिकोडे, द्वितीय- मनस्वी दवंडे, तृतीय क्रमांक पूर्वा भोपी हिने पटकाविला. मुलांसाठी 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम- प्रणित गावंड, द्वितीय- करण पाटील, तृतीय- आनंद थळे, तर मुलींसाठी 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम- पूर्वा भोपी, द्वितीय- ऋचा पाटील, तृतीय क्रमांक नम्रता भगत हिने पटकाविला.
याशिवाय मुलांसाठी आयोजित गोळाफेक स्पर्धेत पांडुरंग केंद्रे, संकेत पाटील आणि करण पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय, तर मुलींसाठी गोळाफेक स्पर्धेत मयुरी राणे, माया जेठे, आरती पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे यश मिळविले आहे. तसेच महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत सेंट मेरी स्कूल संघाची सरशी झाली असून, बाबदेव स्टार यांनी दुसर्या स्थानावर आपली मोहोर उमटविली. तर पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत बापदेव लाईन बॉईज एटीमने प्रथम क्रमांकाचे स्थान राखले असून, बापदेव लाईन बॉईज बी. टीमला दुसर्या क्रमांकाचे यश मिळाले आहे.
उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या प्रत्येक क्रीडाप्रकारात पंच म्हणून यतिराज पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी सुरेंद्र म्हात्रे, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी आणि टीम यांनी परिश्रम घेतले.







