। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आपले कर्तव्य बजावत असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने मदत करावी, वायु किंवा रसायन गळती झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम श्वासोश्वास कसा द्यावा, या बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, टाटा स्टील लिमिटेड आणि लाईफ गिअर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटमधील पोलीस अधिकारी आणि अमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आणि खालापूर टोल नाका येथील कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.
डॉ. सुरेश कुमार मेकला-अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, यांचे मार्गदर्शनाखाली मा. तानाजी चिखले-पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, मा. घनश्याम पलंगे पोलीस उपअधीक्षक, रायगड विभाग, भरत शेंडगे-पोलीस निरीक्षक, पनवेल विभाग आणि मा. अनिल शिंदे-पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ मुंबई बाजूस असलेल्या ट्रक टर्मिनल्स येथील सभागृहात हे शिबीर संपन्न झाले. गुरुनाथ साठेलकर, धनंजय गीध, पंकज बागुल, सौरभ घरत, अमोल कदम आणि हरदिप सिंग यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेत सर्वांशी संवाद साधून शंकांचे निरसन करत प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिकदेखील करवून घेतले.
महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे पोलीस उपनिरीक्षक संजय हेमाडे आणि गजानन म्हात्रे यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षकांचे स्वागत केले, तर पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालकाची भुमिका पार पाडली. अत्याधुनिक उपकरणे आणि हाती असलेल्या संसाधनातून आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी या शिबिरातून जुजबी माहिती आणि मिळालेले प्रशिक्षण स्व संरक्षणासोबत महामार्गावरील इतर घटकांनादेखील फायद्याचे ठरेल, असे मत प्रशिक्षणार्थींनी व्यक्त आले.