भात लावणीसाठी मजूर मिळेनात

हंदा पद्धत लुप्त झाल्याने शेतकरी चिंतेत

। चिरनेर । प्रतिनिधी ।

औद्योगिक विकासामुळे उरण तालुक्यातील शेती क्षेत्र दिवसागणिक कमी होत आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून उरण तालुक्याची ओळख होती. मात्र आजच्या घडीला या शेतीप्रधान तालुक्यात शेती कामासाठी लागणारे मजूर मिळणं दुरापास्त झाले आहे. त्यामुळे, कोणी मजूर देता का? मजूर म्हणत गावोगावी शेतीमालकांवर भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे यामुळे इतरांची शेतजमीन तीन हिस्से देऊन देखील कोणी कसायला घेत नसल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.

सध्या उरण तालुक्यात शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतीच्या कामासाठी वेगवेगळी अत्याधुनिक यंत्र सामग्री आली आहे. मात्र, शेत मजुरांचीच गरज ही लागतेच. परंतु शेतीच्या कामांसाठी उरण तालुक्यात मजूर मिळत नसल्याने शेती ओसाड ठेवण्याची शेतकर्‍यांवर वेळ आली आहे. सध्या उरण तालुक्यात मोठया प्रमाणावर गोदामे निर्माण झाली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रोजगार मिळत आहे. पूर्वी रोजगारांची साधने कमी असल्याने सहज मजूर उपलब्ध होत असत. दिवसभर उन्हात पावसात मेहनतीची कामे कशाला करायची? म्हणून मजूर शेतीच्या कामाला नकार देत आहेत. मजुरांअभावी शेतकरी हतबल झाले आहेत. दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असून उपलब्ध मजुरांनी त्यांच्या मजुरीचे दर वाढविले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती करणे फार अवघड होऊन बसले आहे. तालुक्यात पेरणीची लगबग सुरू असून, पेरणी झाल्यानंतर भात लावणी करिता मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते. 300 ते 400 रुपये मजुरी मजुरांना रोख मोजावी लागते. याशिवाय सकाळचा चहा नाष्टा, दुपारचे मासळी, मटन-चिकनचे जेवण, शाकाहाराचा वार असल्यास दोन-तीन भाज्या पापड लोणचे वरण भात भाकरी अशा जेवणाची मजुरांना व्यवस्था करावी लागते. त्यामुळे आता शेती करणे शेतकर्‍यांना कठीण होऊन बसले आहे.

अवजारे, महागडी बियाणे मजुरांचा तुटवडा, वाढती मजुरी, महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वाढत्या गोदामांचा परिणाम येथील शेतीवर झाला आहे. पूर्वी जे शेतकरी मेहनत करत होते, ती मेहनत आता दिसून येत नाही.

विजय पाटील,
चिरनेर शेतकरी
Exit mobile version