अलिबागच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा, कृषीवलच्या संपादिका माधवी सावंत यांचा विशेष सत्कार
![](http://krushival.in/grygrars/2024/01/nagav2-1024x558.jpg)
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञान मिळावे यासाठी केंद्र शिक्षक संदीप वारगे यांच्या संकल्पनेतून हटाळे शाळेमध्ये प्रयोगशाळा खूली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला असून अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 17) रोजी पार पडला.
यावेळी कृषीवलच्या संपादिका माधवी सावंत, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, नायब तहसीलदार अजित टोळकर, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, नागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, सदस्य निखील मयेकर, आदेश मोरे, ग्रापंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्वेता कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जान्हवी घरत, सदस्य नर्मदा मोहिते आदींसह केंद्र प्रमूख संदीप वारगे,मुख्याध्यापक रश्मी पाटील, विजया माळी, सीमा नागावकर, ॲड. के.डी. पाटील, पालक, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार विक्रम पाटील यांच्यासह मान्यवरांचे शाळेत आगमन होताच, त्यांचे विद्यार्थ्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर फित कापून प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगाची मान्यवरांनी पाहणी करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या दरम्यान नागाव येथील रहिवासी माधवी सावंत यांची कृषीवलच्या संपादक पदी निवड झाल्याने शाळेच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील शिक्षिकांनी उपस्थित महिला मान्यवर, महिला पालकांचे औक्षण करून त्यांना सौभाग्याचे वाण दिले.