एमआयडीसीत स्वच्छतेचा अभाव

सार्वजनिक ठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा, उद्योजकांसह नोकरदारांकडून नाराजी
| पनवेल । वार्ताहर ।
एमआयडीसीमधील ए लेन परिसरात सार्वजनिक ठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा आढळून येत आहे. येथील कचरा नियमित उचलला जात असल्याचा दावा घनकचरा विभागाने केला असला तरी स्वच्छतेबाबत येथील घटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नवी मुंबई एमआयडीसीत पायाभूत सुविधांची कमतरता हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. सध्या काही भागांत रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात सुरू आहेत. मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. दिघ्यापासून शिरवणेपर्यंत एमआयडीसीत जागोजागी कचरा पडलेला दिसत आहे. काही कंपन्यांकडून टाकाऊ वस्तू थेट रस्त्यावर टाकल्या जात आहे. पॅकिंगसाठी वापरलेल्या वस्तू अधिक दिसत आहेत. रद्दी, यंत्रांचे निकामी भागही रस्त्यावर टाकल्याचे आढळून येत आहे. हॉटेलमधील टाकाऊ अन्न टाकले जात आहे. ज्या ठिकाणी कचराकुंडया आहेत तेथील कचरा उचलला जातो. मात्र कचरा टाकण्याची अनेक नवी ठिकाणे निर्माण झाली आहेत, अशी खंत शिरवणे एमआयडीसीतील एका हॉटेलचालकाने व्यक्त केली. नवी मुंबई महापालिका शहर सुशोभीकरणावर भर देत आहे. मात्र शहरालगत असलेल्या एमआयडीसीत फेरफटका मारला असता हे सुशोभीकरण दिसत नाही. उड्डाणपुलाची रंगरंगोटी वगळता सुशोभीकरण होत नाही, असा दावा येथील एका उद्योजकाने केला आहे. अस्वच्छतेमुळे येथे काम करणार्‍या नोकरदारांसह उद्योजकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


एमआयडीसीमध्ये अनेक ठिकाणी राडारोडा पसरलेला आहे. त्यामुळे पालिकेची भरारी पथके काय करतात, असा प्रश्‍न विचारला जात आहे. नियमित कचरा उचलताना हा राडारोडा उचलला जात नाही. कचरा आणि राडारोडा या समस्या एमआयडीसीत आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्यानंतर कचरा नियमित उचलला जात होता. मात्र कचराकुंडीतील कचरा उचलला जात आहे. इतर ठिकाणी पडलेला कचरा तसाच पडून राहत आहे. राडारोडाही अनेक ठिकाणी पडलेला आहे. याबाबत पालिकेने विशेष मोहीम राबवली तर आम्हीही त्यात सहभागी होऊ.

Exit mobile version