सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
आंबोली घाटामध्ये वारंवार मोठ्या प्रमाणावर फॅक्टरी कचरा व मृत ब्रॉयलर कोंबडी फेकण्याचे प्रमाण वाढले असून, दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे वनविभागाने गस्त वाढवून असा प्रकार करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे. आंबोली घाटामध्ये गेली काही वर्षापासून अज्ञातांकडून कचरा तसेच मृत ब्रॉयलर कोंबडी फेकण्याचे प्रकार केले जात आहेत. घाटामध्ये रात्रीच्या वेळी हे प्रकार केले जातात. त्यामुळे घाटामधून प्रवास करणार्या वाहन चालकांना तसेच निसर्गप्रेमींना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागेवर हा कचरा फेकला जातो. सद्यस्थितीत घाटात असलेला मोठ्या प्रमाणातील कचरा लक्षात घेता कोणती तरी मोठी गाडी ट्रक वा टेम्पो तो कचरा त्याठिकाणी टाकून जात असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे वन कर्मचार्यांना तो कचरा त्याच ठिकाणी जाळवा लागत आहेत. त्यामुळे जंगलामध्ये वणवा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कचर्याची विल्हेवाट योग्य त्या लावणे गरजेचे असून वन विभागाने याबाबत गस्त घालून पहारा ठेवण्याची गरज आहे.
घाटात मृत ब्रॉयलर कोंबड्या टाकण्याचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे वन्यप्राणी त्या कोंबड्या खाण्यासाठी भरदिवसा रस्त्यावर येऊ लागले आहेत. त्यमध्ये रानकुत्रे, बिबट्या, वाघ, रानटी मांजरे इत्यादींचा समावेश आहे. ही कोंबडी खाल्ल्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका संभवतो. ज्या ठिकाणी ही कोंबडी खाण्यासाठी हे वन्यप्राणी येतात त्या ठिकाणी शिकारी सुद्धा आपले गस्त घालून बसून शिकार करू शकतात अशीही भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली. आंबोली घाटाला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे हा घाट अतिशय सुंदर दिसतो; परंतु मानवाकडून अशा प्रकारे कृत्य होत असल्याने निसर्गप्रेमी व पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारचे प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी वनविभाग व पोलिसांनी धडक कारवाई करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.