किल्ले रायगडावर सोयीसुविधांची वानवा

स्वच्छतागृह नसल्याने महिलांसह, विद्यार्थिनींचे हाल

| महाड | प्रतिनिधी |

ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यास आता शैक्षणिक सहलींची गर्दी वाढू लागली आहे. प्रतिदिन जवळपास तीस ते चाळीस शैक्षणिक सहलींच्या गाड्या रायगडावर दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे सलग सुट्ट्या आणि शनिवार, रविवार या दोन दिवशी शिवप्रेमी, पर्यटक मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. मात्र, येथील सोयीसुविधांच्या अभावामुळे पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत. राहण्यासाठी असुविधा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला आणि मुलींचे हाल होत आहेत.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचे स्थळ असलेल्या किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षापासुन लक्षणिय वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले महत्व पाहून राज्य शासनाने किल्ले रायगडचा परिसर आणि गड विकासीत करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. काही प्रमाणात विकासकामे सुरु करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात गडावर आणि गडाच्या परिसरांमध्ये सोयीसुविधांची कमतरता दिसून येत आहे. राज्यभरातुन येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सहलींचा आहे. या दरम्यान किल्ले रायगडवर शैक्षणिक सहली आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. दिवसाला किमान तीस ते चाळीस मोठ्या बसेस किल्ले रायगड पाहण्यासाठी दाखल होत आहेत. अनेक जण रोपवेचा, तर काही पायी जाण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या पायथ्याच्या मार्गावर वाहन कोंडीचा प्रश्न उद्भवला आहे. याठिकाणी दोन्ही बाजूला मोठी वाहने आणि छोट्या गाड्या पार्क केल्या जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे. यामुळे दैनंदिन एसटीच्या गाड्यांना या वाहन कोंडीतून मार्ग काढताना कसरत करावी लागते. रायगड पाहण्यासाठी गेलेले विध्यार्थी किंवा पर्यटक हे गाड्यापार्क करुन जात असल्याने त्या बाजूला करणे कठीण जात आहे. पूर्ण दिवस या गाड्या एकाच जागी उभ्या राहत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा गेली अनेक वर्षापासून केली जाते. मात्र तलाव दुरुस्ती, नळ जोडण्या आदी कामासाठी विलंब होत असल्याने प्रतिदिन हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना पिण्याचे पाणी मात्र आज देखिल विकतच घ्यावे लागत आहे. चित्ता दरवाजामध्ये देखील पाण्याची सुविधा नसल्याने पायी जाणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय गडावर आणि परिसरात नसल्याने बांधण्यात आलेले स्वच्छतागृह तसेच पडून आहेत. जिजामाता समाधी स्थळ, किल्ले रायगड आदी ठिकाणी हे स्वच्तागृह उभे केले असले, तरी पाण्या अभावी महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत आहे. स्थानिक व्यवसायिक मात्र पाणी नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्यांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून येते.

धर्मशाळा दुरुस्ती झाली तरी बंदच
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली धर्मशाळा आहे. या धर्मशाळेची दुरवस्था झाल्याने रायगड प्राधिकरणच्या माध्यामतून धर्मशाळेची दुरुस्ती करण्यात आली. मात्र अद्याप हि धर्मशाळा पर्यटक किंवा विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. देखरेख करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने आणि याठिकाणी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाला पाणी नाही. शैक्षणिक सहलींना राहण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. धर्मशाळेला प्रशस्त सभागृह आणि सहा छोट्या खोल्या आहेत. मात्र याठिकाणी स्वच्छता नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथील स्वच्छतागृह देखील नादुरुस्त झाली असून याठिकाणी देखील पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वछता आणि दुरुस्ती केल्यास नाममात्र भाडे घेऊन शैक्षणिक सहलींना उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होणार आहे.
Exit mobile version