मुरुड नगरपरिषदेच्या शाळेत सोयीसुविधांची कमतरता

। मुरूड । वार्ताहर ।
मुरुडमधील नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळा क्रं.1 मध्ये नविन इमारतीची दुरवस्था असून अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह शिक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून याबाबत मनसेने प्रशासकीय अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले असल्याची चर्चा रंगली आहे.

नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 शाळेच्या करण्यात आलेल्या व्यवस्थापनात नगरपालिकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या बालवाडीसह 191 असताना फक्त तीन शिक्षक आहेत. शाळा क्रमांक 1 च्या नवीन वास्तू आणि सुविधांसाठी पालिकेने लाखो रुपये खर्च केलेले असताना सुद्धा शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने मुरुड मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली.

आजची परिस्थिती पाहता पालिकेचा कारभार किती निष्काळजी आहे हे सहज दिसून येत आहे. यासंदर्भात मनसे मुरुड कडून माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या अंतर्गत स्पष्टीकरण मागितल्या असता पालिकेकडून अपूरी माहिती आणि अर्धवट उत्तरे मिळालेली आहेत. याचाच निषेध म्हणून मनसे मुरुड शहर अध्यक्ष यांनी शाळेत पालिकाअधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. नगरपालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू पाहते की काय?असा सवाल उपस्थित करण्यात आला. आज सद्यस्थितीत या शाळेच्या जुन्या इमारतीच्या कौलांची पहिली रांग कधीही खाली पडू शकते. हात धुण्याच्या ठिकाणी बेसिनला र्ेीीं श्रशीं ळिशि नाही. आजुबाजूला झाडी वाढलेली असल्याने जन-जनावरांचा धोका आहे. बाथरुम वर झाडी वाढलेली असून दरवाजे नाहीत. शाळेत जाण्याच्या मार्गांवर मोठी दगड आणि टोकदार लादीचे तुकडे पडले आहेत, शाळेच्या नवीन इमारतीला पावसाची गळती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पेले नाही. यासह अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह शिक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version