कारागृहावरील नजर ‘कमजोर’

निधीअभावी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास दिरंगाई

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील जिल्हा कारागृहामधील सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाले आहेत. त्याजागी नवीन कॅमेरे बसविण्याचे नियोजन जिल्हा कारागृहाने केले आहे. जिल्हा नियोजन समितीकडे त्यासाठी निधीची मागणी केली आहे. मात्र, या आर्थिक वर्षात हा निधी उपलब्ध झाला नाही. 2023-24 या आर्थिक वर्षात निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निधीअभावी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे लांबणीवर जाणार आहे.

अलिबाग येथील जिल्हा कारागृह ऐतिहासिक वास्तूमध्ये आहे. सरखेल कान्होजी आंग्रेकालीन ही वास्तू पूर्णतः दगडाच्या बांधकामाची आहे. 280 कैद्यांच्या क्षमतेचे हे कारागृह आहे. त्यात 80 महिला व 200 पुरुष कैद्यांचा समावेश आहे. या कारागृहात 25 शिपाई, चार हवालदार व तीन अधिकारी कार्यरत आहेत. कैद्यांच्या देखरेखीचे काम या 32 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरोवशावर चालत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहाच्या परिसरात तत्कालीन जिल्हा कारागृह अधीक्षक सचिन चिकणे यांच्या कालावधीत सुमारे आठ कॅमेरे बसविण्यात आले होते. प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसरात हे कॅमेरे बसविलेे होते. कैद्यांच्या प्रत्येक संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम हे कॅमेरे करीत होते. परंतु, ते खराब झाल्याने काढण्यात आले आहेत. त्यांच्याऐवजी नवीन कॅमेरे बसविण्याचा निर्णय जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकरे यांनी घेतला आहे. कारागृहातील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधीची मागणी जिल्हा कारागृहाकडून करण्यात आली आहे. एकूण 50 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. परंतु, निधी उपलब्ध न झाल्याने जिल्हा कारागृहात सीसीटीव्ही बसविण्याचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. जिल्हा कारागृहाकडून पुन्हा प्रस्ताव दाखल झाल्यावर 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे यांनी दिली.

दहा वर्षांत सहा आरोपींचे पलायन
सरखेल कान्होजी आंग्रेकालीन असलेल्या या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. जमिनीपासून सुमारे 36 फूट उंच असलेल्या या इमारतीचा वापर जिल्हा कारागृह म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. भक्कम भिंत असलेल्या या कारागृहातील कैद्यांवर पोलिसांची कायमच नजर असते. तरीदेखील पोलिसांना चकवा देत अनेक वेळा काही कैद्यांनी या कारागृहातून पळ काढला आहे. गेल्या दहा वर्षांत सहा जणांनी पळ काढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या कारागृहात सीसीटीव्ही असणेही फार मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यात कैदी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे मानले जात आहे.

Exit mobile version