वेळेवर पैसे न मिळाल्याने ग्राहकांकडून संताप
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल आणि रेवदंडा येथील एटीएसमध्ये पैसे नसल्याने बुधवारी ऐन भाऊबीजेच्या दिवशी ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली. दरम्यान, चौल नाका येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद होते, तर बाजूलाच असलेले एक्सीस बँकेचे एकमेव एटीएमवर पैसे मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी होती.
दिवाळीच्या खरेदीसाठी बँक ग्राहक एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले, परंतु एटीएममध्ये पैशांचा ठणठणाट असल्याने ग्राहकांना आपल्या हक्काचे पैसेही वेळेवर मिळाले नाहीत. नोकरदारांचे आगाऊ वेतन, नियमित वेतन, बोनस यासारख्या मोठ्या रकमा वेतन खात्यात जमा करण्यात आल्या. परंतु विविध बँकांच्या बहुतांश एटीएमधील कॅश अचानक संपल्याने व बँकांना सलग सुट्टी आल्याने एटीएमच्या भरवशावर राहणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. निदान सणासुदीत तरी एटीएममध्ये पुरेशी नव्हे जादाची रक्कम ठेवावी, असे मत वैतागलेल्या ग्राहकांनी व्यक्त केले आहे.
नागरिक एका ‘एटीएम’वरून दुसऱ्या, तिसऱ्याच्या शोधात फिरत होते. मात्र, तेथेही असाच अनुभव येत गेला. अनेक एटीएम केंद्रांमध्ये पैशांचा ठणठणाट होता. ऐन सणाच्या दिवसातच चौल नाका येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद पडले होते. तर, शेजारीच असलेले एक्सीस बँकेच्या एटीएमवर पैसे मिळत होते. त्यामुळे तेथे ग्राहकांची पैसे काढण्यासाठी रांग लागली होती.