प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
नाताळची सुट्टी सुरू झाल्यापासूनच श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु, या वाढत्या पर्यटनामुळे प्रत्येक मार्गावरती होणारी वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर पार्किंगसाठी जागा अपुरी असल्यामुळे पर्यटक आपल्या गाड्या विविध पाखाड्यांमध्ये उभ्या करून ठेवत आहेत. दाबक पाखाडी, भैरवनाथ पाखाडी, चौकर पाखाडी, वेताळ पाखाडी या परिसरामध्ये नागरिकांच्या घरासमोरील प्रवेशद्वारासमोरच पर्यटक गाड्या उभा करून समुद्रकिनाऱ्यावर निघून जात आहेत. पोलिसांनी पार्किंगची तातडीची व्यवस्था म्हणून श्रीवर्धन येथील र.ना. राऊत विद्यालयाच्या मागील बाजूस असलेले पटांगण ज्या ठिकाणी चर खोदून बंद करण्यात आले होते, ते तात्पुरत्या स्वरूपात चालू करून घेतल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी पासून श्रीवर्धन वासियांना दिलासा मिळाला आहे.
श्रीवर्धन नगरपरिषदेकडून शहराच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांकडून पर्यटन कर घेतला जातो. परंतु, या पर्यटन कराच्या मोबदल्यात येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरपरिषदेचे काम आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन येथील मठाच्या स्मशानभूमी जवळ असलेले अवधूत मंदिर, त्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या बसेस व त्या ठिकाणी बनवण्यात येणारे जेवण यामुळे जागृत अवधूत मंदिर परिसर दिवसेंदिवस विद्रूप करून टाकण्यात येत आहे. वास्तविक पाहता नगरपरिषदेने त्या ठिकाणी सूचना फलक लावून उघड्यावरती जेवण बनवण्यास सक्त मनाई आहे. अशा आशयाचे सूचनाफलक लावणे आवश्यक आहे. कारण येणारे पर्यटक जर का या ठिकाणी उघड्यावर जेवण शिजवू लागले तर या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल वाल्यांचा धंदा हा जवळजवळ भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. तरी, श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाने शहरातील कोणत्याही भागांमध्ये उघड्यावरती अन्न शिजवणाऱ्यांवरती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांमधून करण्यात येत आहे.
तसेच, श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधारा दांडा विभागाच्या ज्या दिशेला संपतो, त्या ठिकाणी हेलिपॅड बांधण्यात आलेले आहे. या शासकीय विश्रामगृहाच्या बाजूने असलेल्या जागेतून हेलिपॅडपर्यंत जर का पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तर पर्यटकांच्या शेकडो गाड्या त्या ठिकाणी सुरक्षितपणे उभ्या करता येतील. तसेच, यापासून नगरपरिषदेला देखील उत्पन्न मिळेल. परंतु, केवळ लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या नियोजनाच्या अभावामुळेच पर्यटकांना देखील गैरसोय होत आहे व स्थानिक नागरिकांना देखील असुविधांना सामोरे जावे लागत आहे. येणाऱ्या बेशिस्त पर्यटकांकडून श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्यावर वाळू वरती गाड्या नेण्याचे प्रकार देखील सातत्याने समोर येत आहेत. तरी नगर परिषदेने नेमलेल्या जीव रक्षकांनी अशा गोष्टींकडे गांभीर्याने पाहून सदर गाड्या वाळूवर न देण्याबाबत पर्यटकांना सूचना करण्याची आवश्यकता आहे.






