तळा भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा

जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचे दुर्लक्ष
| तळा | वार्ताहर |
तळा भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. हे महसुलीचे महत्त्वाचे कार्यालय असून, तालुका निर्मितीनंतर जवळपास दहा वर्षांनंतर स्थापन झाले तेव्हापासून रिक्त पदे भरली गेली नसल्याने त्या पदांचा भार इतर कर्मचारी खांद्यावर घेऊन कसे तरी कारभार सांभाळत आहेत. या कार्यालयात एकूण चौदा पदे मंजूर असून, सद्यःस्थितित पाच कर्मचारी कार्यरत आहेत. तालुका डोंगराळ, दुर्गम असल्याने ग्रामीण भागातील जनता येत असते. या कार्यालयात महत्त्वाचे पद उपअधीक्षक भूमीलेख, भूकरमापक, नगर भूमापक, प्रतिलिपी, आवक जावक, (बटवडा)लिपिक, दप्तर बंद, शिपाई अशी नऊ रिक्त पदे आहेत. त्यामुळे इतर कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे कामे खोळंबली जात आहेत. उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अधिकृत कारभार मुरुड येथे असून, तळा, श्रीवर्धन प्रभारी कारभार सोपविण्यात आला असल्याने ते आठवड्यातून एकदाच येत आहेत. त्यामुळे कामाचा निपटारा होत नाही. एका कामासाठी वारंवार खेटे मारावे लागत आहेत, त्यामुळे नागरिकांना वेळ व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.


या कार्यालयात मोजमापणी, फेरफार, वारसनोंद,फेरबदल, नकाशा,जुनी कागदपत्रे, व इतर अनेक कामे केली जातात. जमीन मापणीचे पैसे भरून देखील सहा-सहा महिने कामे केली जात नाही. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावे लागत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, संचालक भूमीअभिलेख, कोकण विभाग मुंबई व जिल्हा भूमी अभिलेख यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version