। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गेले काही दिवस उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाण्याच्या पातळीतही घट झाली आहे. पिकांसाठी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आवक कमी झाल्याने बाजारपेठेतील भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
मटारचे बाजारभाव वाढले असून, 80 रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. लिंबू 10 रुपये प्रति नग दराने विक्री सुरू आहे. काकडी, गाजर, बीटसह पालेभाज्यांच्याही दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. उष्म्यामुळे पालेभाज्या कोशिंबिरीचा समावेश आहारात केला जात असल्याने मागणी वाढली आहे; मात्र दरातही फरक पडला आहे. उष्णतेमुळे आल्याची मागणी घटली असून दरातही घसरण झाली आहे. पाण्याची पातळी खालावत असल्याने भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.
दरवाढीमुळे कोथिंबीर परवडेनाशी झाली आहे. दरवाढीचे नियंत्रण गरजेचे आहे. महागाईची झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे आवक घटली असून, दरात वाढ झाली आहे.