तांत्रिक बिघाडामुळे लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात
| रायगड जिल्हा | प्रमोद जाधव |
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु, ई- केवायसीचा सावळा गोंधळ समोर आला आहे. शासनाची अधिकृत वेबसाईट सतत बंद होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
विधानसभा निवडणुकीपुर्वी 2024 मध्ये लाडकी बहिण योजना महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात आली होती. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. शिधापत्रिका, आधारकार्ड आदी कागदपत्रे अपलोड करून महिलांचे अर्ज भरण्यात आले होते. गतवर्षी रक्षा बंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले. तेव्हापासून या योजनेला सुरुवात झाली. दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यात जमा होत असल्याने महिलांमध्ये देखील आनंद निर्माण झाला. रायगड जिल्हयातील आठ लाखहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता.
आता मात्र ही महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडू लागली आहे. मागील महिन्यात जिल्ह्यातील 60 हजार बहिणींची पडताळणी करण्यात आली होती. आता या योजनेतील लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत शासनाच्या ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसी करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. काही ठिकाणी इंटरनेटची समस्या निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी अधिकृत संकेतस्थळ खूले होत नाही. वेबसाइटवर आधार क्रमांक टाकल्यावर एरर दाखवले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे पुढील प्रक्रिया थांबते. आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया करत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येत नसल्याची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया थांबून अर्ज अपूर्ण राहत आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरता येत नाही. जिल्ह्यांमध्ये महिलांना या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीचा सावळा गोंधळ सुरु झाला आहे. ई-केवायसीची प्रक्रीया पुर्ण होत नसल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी ई- केवायसी बंधनकारक केले आहे. याची प्रक्रीया सुरू झाली आहे. एकाच वेबसाईटवर केवायसीचे काम केले जात असल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहे. एरर दाखवले जात आहे. ई-केवायसीसाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
