| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना या योजनेद्वारे दर महिन्याला 1500 रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. या योजनेतील पारदर्शकता आणि गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, यामुळे अनेक महिला लाभार्थींना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली वेबसाईट व्यवस्थित चालत नाही. वेबसाईटला ‘त्रुटी! आम्हाला जास्त ट्रॅफिक येत आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा’, असा मेसेस येत असल्याने लाडकी बहिणीची चिंता वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना वारंवार सायबर कॅफे व आपले सरकार सेवा केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात आपले सरकार सेवा केंद्राचे मालक मनिष विरुकुड यांनी सांगितले की, रोज 20 ते 25 महिलांबरोबर पुरुष पण ई-केवायसी करण्यासाठी येतात.परंतु, दिलेली वेबसाईट चालत नसल्याने निराश होऊन परत जातात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.







