पेरणीची कामे अंतिम टप्प्यात; दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता
| माणगाव | प्रतिनिधी |
रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर माणगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भातपिकाची पेरणी पूर्ण केली असली, तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजाची नजर आकाशाकडे खिळून राहिली आहे. जून महिन्याचा मध्य जवळ आला तरी पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गतवर्षी मे महिन्यातच दमदार पावसाची सुरुवात झाल्याने भातपिकाच्या कामांना वेग आला होता. यंदा मात्र चित्र पूर्णपणे वेगळे आहे. पेरणीची बहुतांश कामे पूर्ण झाली असली, तरी पावसाअभावी उगवण, रोपांची वाढ आणि पुढील शेती नियोजनाबाबत शेतकरी साशंक आहेत. माणगाव, महाड, तळा, रोहा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी भातपेरणी पूर्ण केली आहे. काही ठिकाणी पेरणीच्या अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. मात्र पेरणीनंतर आवश्यक असलेला सातत्यपूर्ण पाऊस न पडल्याने बीजांकुरण आणि रोपांच्या वाढीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर खर्च केला आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाने आणखी दिरंगाई केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माणगाव आणि तळा तालुक्यासह अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेतीशी संबंधित विविध कामे अर्धवट राहिली आहेत. शेतजमिनींमध्ये आवश्यक ओलावा नसल्याने मशागत, खत व्यवस्थापन आणि अन्य कामांना अडथळे निर्माण होत आहेत. पावसावरच संपूर्ण हंगामाचे भविष्य अवलंबून असल्याने शेतकरी दिवसेंदिवस अधिक चिंतेत पडत आहेत. शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे की, सुरुवातीला पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या सर्व गणितांवर पाणी फेरले आहे. आता जोरदार आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने अतिरिक्त खर्च न करण्याचा तसेच हवामान विभागाच्या अंदाजांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थितीनुसार योग्य नियोजन करून शेतीची कामे करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आशेचा किरण कायम
अडचणी, संकटे आणि चिंतेचे ढग दाटले असले तरी कोकणातील शेतकरी आशावादी आहे. निसर्गावर अढळ विश्वास ठेवून बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. काळ्या ढगांच्या आगमनासह शिवार हिरवागार होईल, भातखाचरे डोलू लागतील आणि मेहनतीच्या घामाला यशाचे रूप मिळेल, या आशेवरच शेतकरी नव्या हंगामाची स्वप्ने पाहत आहे. पेरणी पूर्ण झाली असली, तरी खरी कसोटी आता पावसाची आहे; कारण बळीराजाच्या आशा, कष्ट आणि संपूर्ण हंगामाचे भविष्य सध्या आकाशातील ढगांवरच अवलंबून आहे.







