बाप्पाच्या माहेरघरात लगबग वाढली

दहा हजार कारखान्यांमूधन 35 लाख मूती साकार
| खरोशी | वार्ताहर |

ऑगस्ट महिन्यात येऊ घातलेल्या गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असल्याने बाप्पाचे माहेघर म्हणून संबोधल्या जाणार्‍या पेणच्या गणेशमूर्ती कारखान्यात गणपती बनवण्याची लगबग जोरात सुरू असून, तालुक्यातील दहा हजारांच्यावर गणपती कारखान्यांमध्ये साधारणत: 30 ते 35 लाख गणेशमूर्ती निर्माण केल्या जात आहेत.

पेण हे गणेशाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात यांची ओळख आहे. राज्यामध्ये मागच्या दोन वर्षात अनेक संकटे आली या संकटांना तोंड देत गणेशमूर्तीकार आजही उभे आहेत. एकीकडे शासनाने घातलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या निर्बंधांमुळे कारखानदार आर्थिक अडचणीत आहेत, तर दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माती, रंग यासह रोजंदारीच्या दरात वाढ झाल्यामुळे गणपती कारखानदार आर्थिक विवंचनेत आहेत. गणपती बनविण्यासाठी लागणारी माती गेल्यावर्षी 170 रुपये होती. तीच आता 200 रुपयांना मिळत आहे. रंगाची पिशवी 70 रुपयांऐवजी 210 रुपयांनी मिळत असून, यामध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. तर कामगारांच्या रोजंदारीमध्येसुद्धा 10 टक्क्यांनी वाढ झाली असून, कारखान्यात कामगार 300 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत काम करीत आहेत.

यामध्ये गणेशाची डोळे आखणी, स्प्रे पेंटिंग, पेंटिंग यात कामगारांना आठशे ते हजार रुपयांपर्यंत पगार द्यावा लागत आहे. तर मातीकाम, पॉलिश यासाठी चारशे ते सहाशेपर्यंत पगार द्यावा लागत आहे. यासह कारखान्यांमध्ये बर्‍याचअंशी पीओपीच्या मूर्ती तयार होत असल्याने या मूर्तींना मोठ्या प्रमाणात भक्तांची मागणी असते. मात्र, शासन या पीओपीच्या मूर्तीना कुठेतरी बंदी घालत असल्याने यामुळेही मूर्तिकार फार मोठ्या आर्थिक संकटात आहेत. मात्र तरीही पेणच्या गणपती कारखान्यात मूर्ती बनवण्याची लगबग जोरदार सुरू आहे.

Exit mobile version