गटविकास अधिकारी करणार गुन्हा दाखल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
भाजपचे कार्यकर्ते, कुर्डूस ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच अनंत पाटील यांनी आपल्या पदाचा वापर करीत 29 लाख 19 हजार 11 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका गटविकास अधिकारी दांईंगडे यांनी ठेवला आहे. ही रक्कम भरण्यासाठी सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा प्रशासन त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तयारी आहेत.
मागील 2019 मध्ये झालेल्या निवडणूकीत अनंत सोमा पाटील सरपंच म्हणून निवडून आले. आठ मार्च 2019 मध्ये त्यांनी सरपंच पदाचा कारभार हाती घेतला. कुर्डूसमधील कमानीला फेब्रुवारी महिन्यात रंग लावला होता. तरीदेखील त्यांनी एप्रिलमध्ये त्याचे काम काढून 49 हजार रुपयांचे बील मंजूर करून घेतले. या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अंगणवाडी परिसरात हायमॅक्स लावण्यापासून अंगणवाडी दुरुस्ती, कोंझरवाडी स्मशानभूमी, पावर घमेल अशा अनेक कामांसाठी लाखो रुपयांचे बील काढले. प्रत्यक्षात मात्र ही कामे झालीच नसल्याचा आरोप सुनील पिंगळे यांनी केला. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली. जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. माजी ग्रामसेवक सुनील म्हात्रे यांच्या अहवालानुसार अनंत पाटील यांनी 29 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले. चौकशी अहवालानुसार कायम स्वरुपी दोन लाख नऊ हजार 829 रुपये तसेच संशयीत 27 लाख नऊ हजार 282 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका गट विकास अधिकारी डी. एन. दाईंगडे यांनी ठेवला आहे.
गटविकास अधिकार्यांच्या भुमिकेकडे लक्ष
अनंत पाटील यांना 29 लाख रुपये भरण्याबाबत गट विकास अधिकारी यांनी सात दिवसांची मुदत दिली. ही मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गट विकास अधिकारी यांच्या भुमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.