नवीन पनवेलमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी

। पनवेल । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून कोकणासह रायगड आणि पनवेलमध्ये पावसानं थैमान घातलं आहे. पावसामुळे पनवेलची धरणेही ओसंडून वाहत आहेत. तरी ही नविन पनवेलमधील अनेक भागात भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सिडको वसाहतीत पाणी प्रश्‍न गंंभीर असताना दुसरीकडे सिडको उद्यानात दररोज लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होताना दिसत आहे.

नविन पनवेलमध्ये गेेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. येथील नागरिकांना सिडकोकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. एकीकडे रहिवासी भरमसाट पाणी बिले भरुनसुध्दा नळाला पिण्याचे पाणी येत नसल्यामुळे काही सोसायट्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागतात. तसेच सेक्टर 13 मधील काही चाळींना पाणीपुरवठा होत नसल्यामुळे तेथील नागरिकांनी स्वखर्चाने बोअरवेल मारले आहेत. दुसरीकडे नविन पनवेलमध्ये काही सार्वजनिक शौचालयामध्ये सिडकोकडून पिण्याच्या पाण्याचे नळाचे कनेक्शन दिले आहेत. महापालिका स्थापन होऊन पाच वर्षे झाली तरी पालिकेकडून पाण्याच्या नियोजनाबाबत कुठलेही धोरण आखले जात नाही. पनवेल महापालिका स्वच्छ सुंदर अभियान राबवित असताना लाखो रुपये खर्च करुन पाणी नियोजनाबाबत सार्वजनिक भिंती रंगवून नागरिकांना पाणी बचतीचा संदेश देत असताना नविन पनवेलमधील पिण्याचे पाणी पुरवठा करणारी यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. पावसाळ्यातसुध्दा सिडको उद्यानातील नळ पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांकडून बंद केली जात नाहीत.

सेक्टर 17 येथील उद्यानात नळाला लाकडी खुंटी लावल्यामुळे कोणीही लाकडी खुंटी काढून गाड्या धुण्यासाठी पाणी घेऊन जातात. तसेच सेक्टर 15 ए मधील उद्यानातील पिण्याचे पाणी उद्यानातील बाजूच्या शौचालयातील चेंबरमधून वास येऊ नये म्हणून उद्यानातील पाईपद्वारे थेट सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये तेथील कामगार सोडतात. त्यामुळे नागरिक सिडको प्रशासनावर संताप व्यक्त करीत असून सिडको प्रशासनाची निष्क्रियता पाणी टंचाईला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Exit mobile version