। रेवदंडा । प्रतिनिधी ।
दोन वर्षानंतर पुनस्यः चौल भोवाळे श्री दत्त यात्रेस प्रारंभ बुधवारी ( 7 डिसेंबर) झाला आहे. पाच दिवसात लाखो रूपयांची उलाढाल असलेल्या या श्री दत्त यात्रेस यावर्षी उत्साह व्दिगुणीत असून मोठी गर्दी पहिल्याच दिवशी पहावयास मिळाली.
पहाटेपासूनच या यात्रेस भाविकांची मोठी गर्दी श्री दत्त मंदिरात होती. चौल भोवाळे ते पहिली पायरी या मार्गात दुर्तफा विविध दुकाने थाटण्यात आली आहेत, यामध्ये मिठाई, खेळणी, हॉटेल, रसवाला, भेळवाला, आदीचा समावेश आहे. तसेच आकाश पाळणा, गोल फिरणारा पाळणा आदी मौज सुध्दा लुटता येणार आहे.
यात्रेतच चौल ग्रामपंचायतीने कार्यालय थाटले असून प्रतिवर्षापासून यात्रेकरूना सुविधा देत आहेत, तर रेवदंडा पोलिसांचे कार्यालय सुध्दा उभारण्यात आले असून यात्रेवर करडी नजर सिसिटिव्हीच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहे. परिणामी विविध गुन्हेगारीना थारा राहणार नाही. यात्रेत जा-ये करण्यासाठी एस.टी. महामंडळाने अलिबाग येथून एस.टी. बसेसची सुविधा चौल भोवाळपर्यंत केली आहे. यात्रेत येणार्या दोन चाकी व चार चाकी वाहनासाठी पार्किगची सुविधा स्थानिकांनी केली आहे. श्री दत्त मंदिराकडे पायर्यांने मार्गक्रमण करताना स्थानिक गोड शहाळी, मिठाईची दुकाने,तसेच हारवाले, फुलवाले यांची दुकाने थाटली आहेत. चौल भोवाळे श्री दत्त यात्रेत स्थानिक शिवसेना कार्यालय सुध्दा प्रतिवर्षा प्रमाणे उभारण्यात आले असून यात्रेकरूना येथून तातडीचे सहकार्य दिले जाते.