लाल बावटे की जय… दुमदुमले अलिबाग

| अलिबाग | प्रतिनिधी |

हातात लाल बावटा, खांद्यावर लाल मफलर घेऊन ‌‘लाल बावटे की जय…’ असा जयघोष करीत शेकडो कार्यकर्ते अलिबाग येथील शेतकरी भवनसमोर जमले. त्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात काही काळ अलिबाग दुमदुमून गेले. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह या निमित्ताने पहावयास मिळाला. एक वेगळी ऊर्जा व बळ घेऊन पाली येथे मेळाव्याला निघण्यासाठी अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासून घराबाहेर पडले. अलिबाग येथील शेतकरी भवन येथे सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. साडेअकरापर्यंत शेतकरी भवन परिसर कार्यकर्त्यांनी बहरून गेला.

लाल रंगाचे कपडे परिधान करीत, हातात लाल बावटा घेऊन कार्यकर्ते शेतकरी भवन येथे जमले. त्यामुळे शेतकरी भवनचा परिसर लालेलाल झाला होता. ढोल-ताशांच्या गजरात शेतकरी भवनचा परिसर दुमदुमला होता. आला खटारा, आला खटारा या गाण्यांच्या सुराने अनेक कार्यकर्ते मंत्रमुग्ध होऊन गेले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह तरुण, तरुणी, महिला कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. त्यानंतर ढोल ताशावर कोळीगीत वाजविण्यात आले. या कोळीगीताच्या ठेक्यावर अनेक कार्यकर्ते थिरकले. त्यात शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनीदेखील ठेका धरला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने दिसून आला. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अलिबागमधून असंख्य कार्यकर्ते पालीकडे रवाना झाले. ‌‘शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो’, ‌‘लाल बावटे की जय’ असा जयघोष करत अलिबाग येथील शेतकरी भवनमधून कार्यकर्त्यांची रॅली निघाली.

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, सुरेश घरत, असे अनेक शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते. काहीजण दुचाकी, तर काहीजण चारचाकी वाहनांसह बसमधून पालीकडे मार्गस्थ झाले.

Exit mobile version