। अलिबाग । प्रमोद जाधव ।
एसटीतून प्रवास करणार्या प्रवाशांबरोबरच चालक व वाहकांच्या सुरक्षेसाठी महामंडळामार्फत बसमध्ये मेडिकल किट ठेवला जातो. मात्र, रायगड जिल्ह्यातील अनेक आगारातील एसटी बस मेडिकल किटविनाच असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक उपचारासाठी हा किट बसमध्ये दिला जातो. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु, बसमध्ये हा किट नसल्याने या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव, महाड, मुरूड या सात एसटी बस आगाराचा समावेश आहे. जिल्ह्यात 19 हून अधिक एसटी बस स्थानके आहेत. 400 हून अधिक एसटी बस असून, 260 हून अधिक सीएनजीवर चालणार्या बस आहेत. या बसमध्ये लाखो प्रवाशांना सेवा देण्याचे काम एसटी महामंडळ करते. एसटीतून महिन्याला विभागाला सुमारे 37 लाखहून अधिक रुपये उत्पन्न मिळतो. एक लाखाहून अधिक प्रवासी एसटीतून प्रवास करतात. वेगवेगळ्या शासनाच्या सवलतीचा फायदा घेत प्रवासी एसटीतून प्रवास करतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी महामंडळाकडून वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जातात. आगीपासून संरक्षण मिळविण्यासाठी अग्नीरोधक यंत्राबरोबरच प्रवासी व कर्मचार्यांच्या आरोग्यासाठी प्राथमिक उपचार म्हणून मेडिकल किटही एसटी बसमध्ये दिले जाते. परंतु, रायगड जिल्ह्यातील अनेक एसटी बसमध्ये मेडिकल किटच नसल्याचे बाब समोर आली आहे. काही ठिकाणी किटचे बॉक्स आहेत. मात्र किट नाही, तर काही ठिकाणी किट असूनही त्यांची मुदत संपलेली अशी परिस्थिती आहे. सध्या उन्हाचा तडाखा बसत आहे. प्रवास करताना प्रवाशांसह चालक व वाहकांना चक्कर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यावर वेळीच प्राथमिक उपचार व्हावेत, यासाठी मेडिकल किट महत्वाचे आहे. मात्र, एसटीमध्ये मेडिकल किट नसल्याने प्रवाशांसह कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाण्याची विहीर सीएनजीच्या विळख्यात
अलिबाग एसटी बस आगारातील विहीर गेल्या अनेक वर्षापासून आहे. या विहिरीच्या माध्यमातूनच आगारातील कर्मचार्यांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र स्थानकात गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस पंप सुरू आहे. गॅस पंपच्या विळख्यात विहीर सापडली आहे. त्यामुळे स्थानकात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आगारातूनच उपलब्ध झाली आहे.
नव्या गाड्याच्या दुरुस्तीसाठी स्कॅनरचा अभाव
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व महाड एसटी बस आगारात नवीन लालपरी दाखल झाली. बीएस 6 या आधुनिक पध्दतीची ही गाडी आहे. या गाडीच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज संगणकाद्वारे केले जाते. परंतु, नवीन गाडीत बिघाड झाल्यावर त्याची देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे स्कॅनर उपलब्ध नसल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून देण्यात आली आहे.
स्वच्छतागृह बंद, कर्मचार्यांची गैरसोय
अलिबाग एसटी बस आगारातील वेगवेगळ्या एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीचे काम कार्यशाळेमार्फत होते. तेथील कर्मचारी गाड्यांची देखभाल दुरुस्तीचे काम करतात. परंतु, कर्मचार्यांच्या सेवेसाठी असलेले स्वच्छतागृह गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. दुरुस्तीच्या नावाखाली हे बंद ठेवले आहे. त्यामुळे कर्मचार्यांची गैरसोय होत असल्याची माहिती एसटी बस आगारातून मिळाली आहे.
जिल्ह्यातील एसटी बस आगाराला मेडिकल किट पुरविण्यात आले आहे. बसमध्ये किट बॉक्समध्ये औषधे ठेवली जात होती. परंतु ती चोरीला जाऊ लागल्याने वाहकांच्या पेटीत मेडिकल किट ठेवण्याची सूचना केली आहे. ज्या ठिकाणी मेडिकल किट नसेल, तेथील तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाईल. नवीन गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कंपनीचे कामगार असणार आहे. कंपनीकडूनच स्कॅनरद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यांचा कर्मचारी स्थानकात असणार आहे.
दिपक घोडे
विभाग नियंत्रक, रायगड
गेल्या वर्षी मेडिकल किट दिले होता. त्याची मुदत संपल्यावर नव्याने किट देणे गरजेचे होते. मात्र यावर्षी मेडिकल किट अद्याप दिले नाही. बर्याचशा गाड्यांमध्ये मेडिकल किट नाही, ही परिस्थिती आहे.
वाहक
( नाव न सांगण्याच्या अटीवरून)