रायगडची लालपरी गणेशोत्सवासाठी सज्ज

25 एसटी बसेस फुल्ल

| अलिबाग | प्रमोद जाधव |

गणेशोत्सव अवघ्या 40 दिवसांवर येऊ ठेपला आहे. आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहे. बाप्पाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने सजावटीचे नियोजन सुुरू केले आहे. मुंबई, बोरीवली, ठाणेमधील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगडची लालपरी सज्ज झाली असून आतापर्यंत 25 एसटी बसेस फुल्ल झाल्याची माहिती एसटी महामंडळ रायगड विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मुंबई, बोरीवली, ठाणे, पुणे या ठिकाणी नोकरीनिमित्त असलेले चाकरमानी बाप्पाच्या स्वागतासाठी खास सुट्टी काढून गावी येतात. गणेशोत्सवात गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा. एसटी बसेसची कमतरता जाणवू नये म्हणून एसटी महामंडळ विभागाने चाकरमान्यांची काळजी घेतली आहे.

यंदा बोरीवली, ठाणे, वसई, विरार, नालासोपारा एसटी बस स्थानकातून चाकरमान्यांना एसटी बस कोकणासह रायगड जिल्ह्यात घेऊन येणार आहे. तर परतीच्या मार्गासाठी रायगड जिल्ह्यातून एसटी बस चाकरमान्यांना एसटी बस घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाच दिवसाच्या विसर्जनानंतर 100 हून अधिक एसटी बसेस पाठविण्याची तयारी केली आहे. मुंबई, ठाणे, बोरीवली, नालासोपारा, विरार, वसई येथे चाकरमान्यांना 24 ते 25 सप्टेंबर या कालावधीत लाल परी घेऊन रायगडमधून जाणार आहे. परतीला जाण्यासाठी रायगडमधून सुमारे 25 एसटी बसेस फुल्ल झाल्या आहेत.

आरक्षणाची व्यवस्था उपलब्ध
गणेशोत्सवानिमित्त कोकणात, रायगड जिल्ह्यात येणाऱ्या व पुन्हा मुंबई, ठाणे, बोरीवलीमध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी सेवा सुरु केली जाणार आहे. प्रवाशांना सुखकर व आरामदायी प्रवास करता यावा यासाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 24 जुलैपासून जिल्ह्यातील एसटी बस आगारातील स्थानकात आरक्षण केंद्र सुरु केले असल्याची माहिती एसटी महामंडळ रायगड विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी दुरुस्ती व गस्त पथक

मुंबई, पालघर, बोरीवली, ठाणे, कल्याण येथील चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटीची व्यवस्था केली आहे. खड्ड्यांमुळे तसेच अन्य काही कारणांमुळे एसटीत बिघाड झाल्यास तातडीने सेवा देण्यासाठी पोलादपूर, सुकेळी, वाकण, माणगाव, रामवाडी या ठिकाणी दुरुस्ती व गस्त पथक तैनात असणार आहे. महाड-चिपळूण-पेण -खारपाडा-वाकणपर्यंत ही यंत्रणा असणार आहे. ठिकठिकाणी ब्रेक डाऊन वाहनाची देखील व्यवस्था केली जाणार आहे.

खास पनवेल ऑपरेशन
गणेशोत्सवात गावी येणारे व परतीच्या मार्गावर जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी एसटी महामंडळाच्या रायगड विभागामार्फत चाकरमान्यांसाठी खास पनवेल ऑपरेशन सुरु केले आहे. अलिबाग, पेण येथून जास्तीत जास्त पनवेलपर्यंत बसेस सोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी येणाऱ्या व परतीच्या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. गेल्या महिन्याभरापासून आरक्षण नोंदणी सुरु केली आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी नियोजन सुरु आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार, बस सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

दीपक घोडे- विभाग नियंत्रक
Exit mobile version