। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शहापूर, धेरंड येथील एमआयडीसीने संपादित केलेल्या शेतकर्यांच्या जमिनीनंतर खाडीकिनारील बंधार्यांची दुरुस्ती न केल्याने 3 वर्षात 150 शेतकर्यांच्या भात पिकात खारे पाणी शिरुन 2 कोटी 64 लाख 75 हजार रुपयांचे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. खार जमिन विकास खात्याच्या दुर्लक्षामुळे होत असलेल्या नुकसानीची भरपाई शेतकर्यांना देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अतारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत केली.
तालुक्यातील शहापूर व धेरंड (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील बंधार्यांच्या दुरुस्तीअभावी शेतीचे नुकसानाबाबत आ. जयंत पाटील यांनी अतारांकित प्रश्नोत्तरांच्या दिलेल्या उत्तराच्या संदर्भात खार जमिनी विकास मंत्र्यांकडे खुलासा मागत शहापूर व धेरंड (ता. अलिबाग, जि.रायगड) येथील शेतकर्यांच्या जमिनी एमआयडीसीने सन 2009 रोजी संपादित केल्या आहेत. एमआयडीसीने जमिनी संपादित केल्यानंतर खाडीकिनारी असणार्या बंधार्यांची दुरुस्ती केली नसल्याने सुमारे 3 वर्षात 150 शेतकर्यांच्या भात पीकात खारे पाणी शिरल्याने सुमारे 2 कोटी 64 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खार बंधार्यांची कामे करण्यास होत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकर्यांना शेतीच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तसेच खार बंधिस्त बंधार्यांची दुरुस्ती करण्यासाठी कोणती कार्यवाही अथवा उपाययोजना केली आहे असा प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देताना खार जमिनी विकास मंत्री विजय वडेड्डीवार यांनी मान्य करत सदर प्रश्नात नमूद केलेल्या खारभूमी योजनांमध्ये धाकटे शहापूर व धेरंड या शासकीय योजना तसेच मोठापाड़ा शहापूर (मोठे शहापूर) ही खाजगी खारभूमी योजना समाविष्ट आहे. धाकटापाडा शहापूर या योजनेचे पुनः प्रापित क्षेत्र 263.08 हेक्टर असून धेरंड या योजनेचे पुनःप्रापित क्षेत्र 142 हेक्टर आहे. तसेच मोठापाडा शहापूर या खाजगी खारभूमी योजनेचे पुनःप्रापित क्षेत्र 423 हेक्टर इतके आहे. या परिसरात एमआयडीसीने 387.75 हेक्टर एवढे क्षेत्र संपादित केले आहे. एमआयडीसीने जमिनी संपादित केल्यानंतर खाडी किनारी असणार्या बंधार्यांची दुरुस्ती वेळोवेळी करण्यात आली आहे. एमआयडीसीकडून टाटा पॉवर कं. तर्फे 23.70 लक्ष व चखऊउ कडून 35.94 लक्ष अशी एकूण 59.64 लक्ष इतक्या किंमतीची कामे पूर्ण केल्याचे एमआयडीसी चे पत्र क्र. ई-56543/2021. दिनांक 29/11/2021 च्या पत्रान्वये कळविले आहे. तसेच कार्यकारी अभियंता, खारभूमी स. व अ. विभाग, पेण-रायगड विभागामार्फत रोजगार हमी योजनेंतर्गत मोठापाड़ा शहापूर या खाजगी खारभूमी योजनेचे रुपये 7.92 लक्ष इतक्या किमतीचे काम प्रगतीपथावर असून रुपये 22.63 लक्ष किमतीचे काम मंजूर आहे. तसेच खारभूमी विभागामार्फत धेरंड व धाकटापाडा, शहापूर या दोन शासकीय योजनांची कामे उपलब्ध निधीतून हाती घेऊन क्षेत्र बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. मोठापाडा शहापूर ही खाजगी योजना असून ही योजना शासनाच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही शासन स्तरावर प्रगतीपथावर आहे.भातपिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई वेळोवेळी दिली असल्याचे तहसिलदार, अलिबाग यांनी दिनांक 30/11/2021 च्या पत्रान्वये कळविले असल्याचा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी केला.