आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!

सुधाकर घारेंचा महेंद्र थोरवेंवर घणाघाती हल्ला; कोंढाणे धरणाच्या जमीन व्यवहारावरून आरोप-प्रत्यारोपांना धार

| नेरळ | प्रतिनिधी |

कोंढाणे धरणाच्या जमिनीच्या व्यवहारावरून कर्जत तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. आमदारांच्या घरचे आणि जवळचेच धरणाच्या जमिनीची दलाली करतात, असा गंभीर आरोप घारे यांनी केला. आदिवासी आणि जनतेची फसवणूक होत असल्याचा दावा करत घारे यांनी थोरवेंच्या आरोपांची पत्रकार परिषदेत जोरदार चिरफाड केली.

घारे म्हणाले की, आमदार महेंद्र थोरवे यांनी एक दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर कोंढाणे धरणाच्या जमिनीबाबत आरोप केले होते. बोगस पट्टे आणून 70-बच्या माध्यमातून जमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा थोरवे यांनी केला होता. त्यावर पलटवार करत घारे यांनी, आदिवासींच्या जमिनी विकणारे नक्की कोण, हे कर्जत तालुक्यातील जनतेला माहिती आहे. तालुक्यात धरणे आणली आणि त्या धरणासाठी लागणारी जमीन विकण्याची जबाबदारी थोरवेंचे बगलबच्चे करीत आहेत, असा आरोप केला.

महेंद्र थोरवे 20 वर्षांपूर्वी कुठे होते, असा सवालही घारे यांनी उपस्थित केला. 2007 पर्यंत थोरवेंनी कोणते व्यवहार केले, याची माहिती कर्जत तालुक्यातील जनतेला असल्याचा दावा त्यांनी केला. थोरवेंच्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करतानाच माझीही ईडी चौकशी करा, असे आव्हान घारे यांनी दिले.

शिवसैनिकांच्या मुद्द्यावरूनही घारे यांनी थोरवेंना लक्ष्य केले. 2019 मध्ये शिवसैनिकांनी निवडून दिले, असे सांगणारे थोरवे आमदार झाल्यानंतर त्याच शिवसैनिकांच्या विरोधात गेल्याचा आरोप त्यांनी केला. भरत भगत यांच्यामुळे आपण निवडून आल्याचे सांगणारे थोरवे यांनी त्यांनाच जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप घारे यांनी केला. तसेच, तुमच्याच पक्षाचे प्रसाद सावंत यांना कशासाठी मारहाण केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Exit mobile version