विधानसभेच्या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवेंकडून खोटा अपप्रचार भ्रष्टाचार, दादागिरी सुधाकर घारेंचा आरोप
। खोपोली । वार्ताहर ।
आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, डमी उमेदवार उभे करून चुकीच्या तसेच भ्रष्ट पद्धतीने दबाव टाकत निसटता विजय मिळवला असल्याचे सर्व पुरावे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी जमा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 18 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी आहे. शिंदे गटाचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल केल्याने थोरवे यांच्या अडचणी वाढणार का अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत खोपोलीसह अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्यासंबधी तक्रार अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.तसेच मतमोजणीच्या दिवशी वासरे खोंड्यातील एक मशीन बंद पडली होती. यादरम्यान घारे यांचा निसटता पराभव झाल्यामुळे फेर मतमोजणीसाठीची मागणी घारे यांनी केली होती.
त्यानंतर महेंद्र थोरवे यांनी खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, डमी उमेदवार उभे करून चुकीच्या तसेच भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळवला आहे. महेंद्र थोरवे यांचा विजय कर्जत खालापूरमधील जनतेला मान्य नाही. महेंद्र थोरवे यांच्या विरोधातील खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, दादागिरी, डमी उमेदवार याबाबतचे सर्व पुरावे जमा करून सुधाकर घारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने पुरावे तपासून याचिका दाखल केल्याने शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान या प्रकरणी 18 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी असून महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदे गटाचे महेंद्र थोरवे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. महायुतीत त्यामुळे वितुष्ट निर्माण झाले होते. भले थोरवे यांनी घारे यांचे आव्हान परतावून लावत निवडणूक जिंकली होती. हे कट कारस्थान खासदार सुनील तटकरे यांनी रचल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी जाहीरपणे केला होता.