। पनवेल । वार्ताहर ।
सध्या ठिक ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जात आहेत. विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, निवडणुकीसाठी असलेले इच्छुक उमेदवार याकरता अग्रभागी असतात. त्याचबरोबर विविध गृहनिर्माण संस्थांमध्येही हा कार्यक्रम पार पडतो. शनिवारी (दि.1) कळंबोली सेक्टर 14 येथील आशीर्वाद सोसायटीमध्येही सुहासिनींच्या जिव्हाळ्याचा हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी सहभागी झालेल्या महिला भगिनींना संक्रांत वाण म्हणून तुळशीचे रोप देऊन एक प्रकारे पर्यावरण स्नेही संदेश देण्यात आला.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण ‘मकर संक्रांत’ होय. सुगड पुजण्यापासून पुढील 15 दिवस हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. पण, सगळ्याच महिलांना उत्सुकता असते की, हळदी कुंकवाला वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार. यासाठी आयोजकांच्यावतीने वेगवेगळे पर्याय शोधले जातात. मात्र कळंबोलीतील आशीर्वाद सोसायटीच्या महिला आयोजकांनी हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी झालेल्या सुहासिनींना तुळशीचे रोप देऊन ‘ झाडे लावा झाडे जगवा ’ हा एक पर्यावरणपूरक संदेश दिला. तुळशीचे रोप भारतात जवळपास प्रत्येक घरात आढळते. ग्रामीण भागामध्ये तर तुळशी वृंदावन घरासमोर असते. या पवित्र वनस्पतीला केवळ आरोग्य लाभच नाही तर हिंदू संस्कृतीतही खूप महत्त्व आहेच तसेच तुळशी मातेची पूजाही केली जाते. तुळशीला त्याच्या असंख्य आरोग्य फायद्यांसाठी औषधी वनस्पतींची राणी म्हणून ओळखले जाते. या वृक्षाला आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही हळदीकुंकू समारंभामध्ये तुळशीचे रोप वाण म्हणून दिले असल्याचे आशीर्वाद सोसायटीतील महिला सदस्यांनी सांगितले.
हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी झालेल्या सुहासिनींना तुळशीचे रोप देऊन ‘ झाडे लावा झाडे जगवा ’ हा एक पर्यावरणपूरक संदेश दिला. तुळशीचे रोप भारतात जवळपास प्रत्येक घरात आढळते. ग्रामीण भागामध्ये तर तुळशी वृंदावन घरासमोर असते. या पवित्र वनस्पतीला केवळ आरोग्य लाभच नाही तर हिंदू संस्कृतीतही खूप महत्त्व आहेच तसेच तुळशी मातेची पूजाही केली जाते.