ठेकेदार म्हणतो, आम्ही 290 मीटरचा रस्ता बनविला
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीमधील बार्डी गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता 18 लाख खर्चून बनविण्यासाठी निधी मंजूर झाला. मात्र, हा रस्ता ज्या ठिकाणी सुरु होतो तेथून रस्ता न बनविता काही अंतर सोडून तयार करण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत ठेकेदार हा आपल्याला जो 290 मीटरचा रस्ता बनविण्यासाठी निधी मंजूर होता तेवढा लांबीचा रस्ता बनविला आहे अशी भाषा ग्रामस्थांना वापरत आहे. मात्र, रस्त्याचे काम करण्यासाठी ज्या ठिकाणावरून सुरु करण्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे, तेथून हा रस्ता बनविण्यात आला नसल्याने संबंधित ठेकेदारावर रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
बार्डी गावातील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याचे काम करावे यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून 18 लाखाचा निधी देण्यात आला होता.गावातील सुरेश विनू कांबरी यांच्या घरापासून पुढे 290 मीटर लांबीचा रस्ता बनविण्यासाठी 18 लाखाचा निधी मंजूर होता.संबंधित रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे कामाला डिसेंबर 2024 मध्ये करण्यात आले आणि आता तेथे 290 मीटर लांबीचा रस्ता बनून तयार आहे. मात्र, तरीदेखील स्थानिकांना स्मशानभूमीकडे आपली वाहने घेऊन जाता येत नाही. त्याचे कारण रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराने रस्त्याचे काँक्रीटीकरण काम हे सुरेश विनू कांबरी यांच्या घरापासून सुरु केले नाही. तेथून दहा मीटर सोडून रस्ता बनविण्यास सुरुवात केली आणि पुढे 290 मीटर लांबीचा रस्ता बनवून आपले काम पूर्ण झाले असल्याचा दाखल जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून मिळविला.
मात्र, रस्ता सुरेश कांबरी यांच्या घरापासून बनविण्यास घेतला नसल्याने कांबरी यांच्या घरासमोर सांडपाणी साचून राहिले आहे. त्या सांडपाण्यातून वाट काढीत स्थानिकांना स्मशानभूमीकडे जावे लागत आहे.तेथे पाईप मोरी टाकण्याचे अंदाजपत्रकात नमूद असताना देखील ठेकेदाराने जाणीवपूर्वक 10 मीटर पुढे कामाला सुरुवात केली आणि रस्त्याचे 290 मीटर लांबीचे काम पूर्ण केले. त्याचा परिणाम आज रस्त्याचा कोणताही फायदा स्थानिक ग्रामस्थांना नाही. रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी 18 लाखाचा निधी मंजूर होता आणि जेथून रस्ता सुरु होणार होता तेथून रस्ता बनविण्याचे अंदाजपत्रक बनविले गेले आहे. मात्र तेथून रास्तच सुरु झाला नाही आणि त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कामचुकार ठेकेदाराला रस्त्याच्या कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी केली आहे. या रस्त्याचे कामाची जबाबदारी असलेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुशांत गोरे यांचंही संपर्क केला असता त्यांनी अंदाजपत्रकावर रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले जाईल, अशी माहिती ग्रामस्थांना दिली आहे.