| म्हसळा | वार्ताहर |
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प म्हसळा अंतर्गत तीन दिवसीय पोषण भी, पढाई भी प्रशिक्षण तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित करण्यात आले होते. म्हसळा पंचायत समितीचे गटाविकास अधिकारी माधव जाधव यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी माधव जाधव यांसह बाल विकास प्रकल्प अधिकारी रेणुका पाटील, विस्तार अधिकारी दीपाली पालवे, पर्यवेक्षिका रुपाली वारुळे, अरविंद बैनवाड, यांसह अंगणावाडी सेविका उपस्थित होत्या.
याप्रसंगी गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना अंगणवाडी सेविकांचे कामाचे कौतुक करून या सेविकांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या ज्ञानात भर घातली पाहिजे, स्वतः आत्मसात करून ते ज्ञान मुलांना दिले पाहिजे, असे सांगितले. तसेच नवनवीन शैक्षिण उपक्रमांचा स्वीकार करून नावीन्य पूर्ण काम करण्यावर भर दिला पाहिजे त्याचबरोबर शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छ ठेऊन मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहिले पाहिजे आणि बालवयातच कोवळ्या मनाच्या मुलांवर योग्य संस्कार झाले पाहिजेत आणि त्यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन माधव जाधव यांनी केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी रेणुका पाटील यांनी ही प्रशिक्षण कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सर्व सेविकांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली पाहिजे असे सांगून मुलांचा बौद्धिक, शारीरिक विकास अधिकाधिक कसा होईल याबाबत माहिती दिली.