| म्हसळा | वार्ताहर |
तालुक्यातील मेंदडी गावालगत समुद्र खाडी किणार्यावर छोट्या होडीच्या सहाय्याने मच्छिमारी करण्यासाठी गेलेल्या कोळी व्यावसायिकावर खाडीकिनारी झाडा झुडपावर बसलेल्या मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये कोळी व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून मधमशांच्या हल्ल्यात मयताच्या पत्नीचा जीव वाचला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता मयत मच्छिमार दत्ताराम जाण्या पायकोळी (50) रा.मेंदडी कोळीवाडा तो आपल्या पत्नीसोबत दुपारी समुद्र भरतीचा समा असताना खाडीत मासेमारीसाठी गेला होता. या वेळी खाडीकिनारी टाकलेले जाळे जमा करताना तेथील आसलेल्या झाडीतून मधमाशांनी त्यांच्यावर एकच हल्ला केला. बचाव करण्यासाठी मयत दत्ताराम याने पाण्यात उडी घेतली. मात्र, माशांनी त्याची पाठ सोडली नाही. खूप वेळ पाण्यात राहिल्याने अखेर गुदमरून त्याला जीव गमवावा लागला, तर लागलीच होडीत बसून मयताच्या पत्नीने अंगावर पांघरून घेतल्याने तिचा जीव वाचला. या वेळी बोटीत बसून राहिलेल्या मयताचे पत्नीची बोट दोन ते तीन किमी अंतरावर भरकटली होती. आरडाओरड झाल्यानंतर तिला शेजारील गावाच्या मच्छिमारांनी वाचवले असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मेंदडी ग्रामस्थानी धाव घेतली. मात्र, खूप वेळ गेल्याने सदरची घटना घडली .घटनेची फिर्याद म्हसळा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.