बर्ड फ्ल्यूबाबत अफवा न पसरवण्याचे आवाहन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
बर्ड फ्ल्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे. त्याबरोबर जिल्हा प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. मात्र, याचबरोबरच उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. तसेच बर्ड फ्लू बाबत कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
चिरनेर येथील मृत पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू या रोगासाठी होकारार्थी आढळून आल्याचे राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान यांनी शनिवारी (दि. 18 जानेवारी) कळविले आहे. त्या अनुषंगाने, केंद्र शासनाच्या सुधारित 2021 च्या एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा रोगप्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रण राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार बाधित केंद्रापासून 0 ते 1 किमी त्रिज्येच्या परिघास जिल्हाधिकारी, रायगड यांचे आदेशानुसार बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. 2021 च्या एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार बाधित क्षेत्रातील एकूण 1237 पक्षी शास्त्रीयदृष्ट्या नष्ट केले आहेत. तसेच एकूण 177 अंडी व 270 किग्रॅ खाद्य, 50 किग्रॅ तुस व 10 रिकाम्या गोणी नष्ट केल्या आहेत. याकरिता केंद्र शासनाच्या धोरणानुसार संबंधित कुक्कुट पालकांना नुकसान भरपाई अदा करणेसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
फक्त उरण तालुक्यातील चिरनेर गावातील बाधित क्षेत्रापासून 0 ते 1 किमी त्रिजेच्या परिघातील चिकन शॉप 09/02/2025 पर्यंत बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या आदेशात दिली आहे. तसेच यामध्ये सर्व मार्गदर्शन सूचना व उपाय देखील सांगितले आहेत.
उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोठेही पक्षांमध्ये मरतूक असल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 18002330418 / 1962 वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, अशी सर्व जनतेस विनंती करण्यात येत आहे.
डॉ.प्रविणकुमार देवरे,
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे
सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी
बर्ड फ्ल्यु या रोगाची तीव्रता व गंभीरता लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना या रोगाचा राज्यात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हाती घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रीत केल्या आहेत.
पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर
पशुसंवर्धन आयुक्त डॉ.प्रविणकुमार देवरे यांनी कोणत्याही पक्षांमध्ये अचानक मोठया प्रमाणावर मर्तुक झाल्यास त्याची वरिष्ठांना तसेच आयुक्तालय व राज्यस्तरीय रोग अन्वेषण विभाग, पुणे यांचेकडे तात्काळ माहिती देण्याचे सूचित केले आहे. कुक्कुट प्रक्षेत्रावर चोख जैव सुरक्षा ठेवणे, या रोगाबद्दल जनजागृती करणे, दैनंदीन अहवाल सादर करणे इ. बाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांना सूचित करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाने राज्यात बर्ड फ्ल्यु रोग प्रादुर्भाव झाला असला तरीही या रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठीच्या दक्षते संदर्भात उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. आजमितीस राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमधून पक्ष्यांमध्ये मोठया प्रमाणात मरतुक नाही, असे सांगितले आहे.