| रसायनी | वार्ताहर |
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडताना पत्रकारांनी निर्भय आणि निःपक्षपाती राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता सत्य आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे, असे मत ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले.
मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात न्यूज 18 चे वरिष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी राज्यभरातील पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्यांची निवड जाहीर झाली. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी नवे उपक्रम हाती घेण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन, राज्यात पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसाठी पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी सचिन चपळगावकर आणि कोकण विभागासाठी नवनाथ कापले यांची नेमणूक करण्यात आली.महिला पत्रकारांसाठी विशेष योजना, महिला पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र हेल्पलाइन आणि सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव पत्रकार संघटनेने मांडला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिला पत्रकारांना अधिक संधी मिळाव्यात, यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. पत्रकारांचे कल्याण आणि सुरक्षेसाठी ठोस निर्णय, संघटनेच्या बैठकीत पत्रकारांच्या विमा योजना, पेन्शन योजना आणि डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मान्यतेसाठी विशेष धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.पत्रकारांचे हक्क अबाधित राहण्यासाठी आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शासन दरबारी ठोस मागण्या करेल, असे पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोशी, संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, ऑल इंडिया जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी, सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.