चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील विविध विकास कामांना चालना देण्यासाठी तीन ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींचा भूमीपूजन सोहळा शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी, बेलकडे आणि बामणगाव या ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींच्या कामांचा शुभारंभ यानिमित्ताने करण्यात येणार आहे. आक्षी ग्रामपंचायत इमारतीचे भूमीपूजन सायंकाळी 4 वाजता, बेलकडे ग्रामपंचायत इमारतीचे भूमीपूजन सायंकाळी 5 वाजता, तर बामणगाव ग्रामपंचायत इमारतीचे भूमीपूजन सायंकाळी 6 वाजता होणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असून, विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या नव्या इमारतींमुळे ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार असून, नागरिकांना विविध सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहेत. तसेच स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यक्रमास विभागातील सरपंच, सदस्य, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले आहे.







