जमिनीचा भाव आणि रोजगार यावर आधी चर्चा व्हावी

दादागिरी चालणार नाही – जयंत पाटील

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी (एमआयडीसी) ज्या वेळेला भूसंपादन करण्याची नोटीस निघाली, त्या वेळेला गावांनी विरोध केला होता. परंतु, शासनाने नव्याने पेण तालुक्यासह तिसरी मुंबई करण्याची घोषणा केली असून, विकासाला विरोध न करता येथील शेतकऱ्यांनी सरसकट जमीन देण्याचे ठरवले आहे. जमिनी द्यायला आमचा विरोध नाही, मात्र जमिनीला योग्य भाव आणि येथील तरुणांना नोकरीची आधी हमी द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. शेतकरी स्वतःहून जमिनी द्यायला तयार असताना, शासन पोलीस बळाचा वापर करुन जमिनीची मोजणी करुन शेतकऱ्यांवर दबाव टाकत असेल, तर ती दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही आ. पाटील यांनी ठणकावले.

डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पामध्ये बाधित शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडण्यासाठी आ. जयंत पाटील मंगळवारी (दि. 12) रोजी प्रांताधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या चर्चा केली. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही आमची जमीन शासनाला देण्याचे मान्य केले आहे. याबाबत आ. जयंत पाटील जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे सांगितले.

यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले की, आम्ही जागा देण्यास तयार असल्यामुळे भूसंपादन करण्याची काही गरज नाही आणि मोजणीचा दिखावा करण्याची तर गरजच नाही. मोजणी आधीच झालेली आहे, सरकारी दप्तरात जागा कुणाची आहे, हे नमूद आहे. मात्र, मोजणी करून शेतकऱ्यांच्या एकजुटीला फूट पाडण्याचा डाव आहे. आम्ही ज्या वेळेला विरोध करत होतो, त्यावेळी सरकारने तिसरी मुंबई जाहीर केली नव्हती. परंतु, आता तिसरी मुंबई जाहीर केल्याने आम्ही विकासाला विरोध करणार नाही; परंतु आमची मूळ मागणी जी आहे ती भाव आणि रोजगार हे देणे गरजेचे आहे. यावेळी आ. जयंत पाटील यांनी प्रांताधिकारी यांना येत्या दोन-चार दिवसांत कंपनी प्रशासनाच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावण्यास सांगितले आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रांत कार्यालयात गडब, काराव या विभागातील शेकडो शेतकरी जमले होते. त्यांनी जमिनी विकण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आ. जयंत पाटील यांना दिले आहेत. परंतु, आ. पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, चर्चा करण्यासाठी मला पुढाकार दिला असला तरी चर्चा होताना सर्व शेतकरी, कंपनी प्रशासन आणि महसूलचे अधिकारी एकत्र येऊन योग्य ती चर्चा केली जाईल. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, अतुल म्हात्रे (मास्टर लंडन), निलेश म्हात्रे, माजी नगराध्यक्ष गुरूनाथ मांजरेकर, कमलाकर म्हात्रे, गजानन पेढवी, सुशील कोठेकर, विजय पाटील, माजी सरपंच सुनिल कोठेकर आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा जमिनी द्यायला विरोध नाही, मात्र जमिनीला योग्य भाव व येथील तरुणांना नोकरीची हमी एमआयडीसी प्राधिकरण अथवा महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी. आम्ही जमीन जेएसडब्ल्यू कंपनीला देणार आहोत, त्यामुळे आमची चर्चा ही कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समोरासमोर व्हावी. यामध्ये कोणत्याही दलालाची आम्हाला गरज नाही.

आ. जयंत पाटील,
सरचिटणीस, शेकाप

शेतकऱ्यांनी जमीन देण्याचे ठरवले असून, लेखी निवेदन दिले आहे. ते मी वरिष्ठांकडे पाठवणार आहे, योग्य तो निर्णय वरिष्ठ घेतील.

प्रवीण पवार,
प्रांताधिकारी

कंपनीने शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा, कारण आयुष्यभराची शेती कंपनीला द्यायची आहे. याबाबतचे सर्व निर्ण घेण्याचे अधिकारी शेतकऱ्यांनी आमचे नेते जयंत पाटील यांना दिले आहेत. ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहेत.

निलेश म्हात्रे, सदस्य,
ग्रामपंचायत वडखळ
Exit mobile version