रोहा तालुक्यात जमीन घोटाळा उघड; शिवसेना नेत्याचा समावेश

सहा जणांवर गुन्हा दाखल; दलालांचे धाबे दणाणले
। रोहा । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यात बल्क ड्रग्ज फार्मा पार्कला शेतकर्‍यांचा विरोध असतानाही शासनाकडून जमीन संपादन सक्तीने लादण्याचे काम होत आहे. गाव गावातील दलाल लॉबीमुळे गावामध्ये शेतकर्‍यांची फसवणुक व जमिनीचे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतानाच. रोहा तालुक्यातील तलाठी सजा कोकबन विभागात आणखीन एक जमीन घोटाळा प्रकरण समोर आला आहे. या प्रकरणी अटक झालेल्यामध्ये शिवसेना नेत्याचाही समावेश आहे.


फिर्यादी गणेश कोल्हटकर यांचे पणजोबा कै. हशा नागू कोल्हटकर हे सन 1975 साली मृत्यू पावले असताना, त्यांच्या जागी तोतया इसम उभे करून 2011 मध्ये रोहा दुय्यम निबंधक कार्यालयात येथे त्यांच्या मालकी हक्काची जमीन खोटी व्यक्ती उभी करून खरेदीखत करण्यात आला. त्यामुळे फिर्यादी कोल्हटकर रा. कोकबन यांची तक्रारी नंतर रोहा पोलीस स्टेशनमध्ये अखेरीस चाळीस वर्षांपूर्वी मयत व्यक्तीच्या जागी तोतया व्यक्ती उभा करून खरेदीखत केल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल केला.


फिर्यादीनी तक्रार नोंदवून आता पाच महिने उलटले होते. परंतु राजकीय व दलाल लॉबीमुळे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. शेवटी सर्वहारा जनआंदोलन च्या सामजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी शेतकर्‍यांची बाजू मांडल्याने शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षक दुधे यांनी याची दखल घेऊन रोहा पोलीस स्टेशनला याबाबत आदेश दिले. 6 डिसेंबर 2022 रोजी तक्रारदार कोल्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भगवान घोडे, गिरीश सिनकर, उद्देश वाडकर, पांडुरंग केमसे, एक अनोळखी व्यक्ती व तत्कालीन दुय्यम निबंधक रोहा अशा एकूण सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पूर्ण रोहा तालुक्यात खळबळ उडाली असून असे जमिनीचे घोटाळे करणार्‍या दलालांचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version