कोट्यवधींचा जमीन घोटाळा?; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

अजित पवारांच्या लेकाच्या अडचणीत वाढ

| पुणे | प्रतिनिधी |

अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांवर सरकार मेहेरबान झालं आहे. पार्थ पवारांवर जमिनीची खैरात करण्यात आली आहे. मुळची महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या घशात घालण्यात आली आहे. सारखं फुकट, सारखं माफ असं कसं चालेल म्हणणाऱ्या अजित पवारांच्या लेकानेच जमीन लाटल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील जवळपास 40 एकर जमीन, जिची किंमत 1800 कोटी आहे. ती पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला अवघ्या 300 कोटींना देण्यात आली आहे. सरकारी जमिनीवर डल्ला मारल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, आतापर्यंत तहसीलदार आणि दुय्यम उपनिबंधकांना निलंबित करण्यात आले आहे.

एवढंच नव्हे तर, या व्यवहारासाठी लागणारी तब्बल 21 कोटींची स्टँपड्युटीही माफ करण्यात आली आहे. फक्त 500 रुपयांच्या स्टँपपेपरवर या व्यवहाराचा करार करण्यात आला. सगळे नियम मोडून-तोडून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांसाठी हा व्यवहार झाला आहे. पुण्यातला उच्चभ्रू कोरेगाव पार्क भागातल्या जवळपास 40 एकर जमिनीची पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली. पार्थ पवारांच्या या कंपनीत त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत. 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास 21 कोटींची स्टँप ड्युटी माफ करण्यात आली.

कोरेगाव पार्क भागातील ही जमीन मूळ महार वतनाची आहे. आता ती सरकारी जमीन आहे. या जमिनीचा व्यवहार हा शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत अमेडिया कंपनीनं केल्याचं दिसत आहे. प्रत्यक्षात खरेदीखत हे गायकवाड आणि 274 मूळ मालक यांच्यासोबत अमेडिया कंपनीनं केलं आहे. यावर आता विरोधकांनीही अजित पवारांना घेरलं आहे. 1800 कोटींची जमीन 300 कोटींना घेतली. आता तुम्हाला कसं फुकट लागतं? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारनं हा संपूर्ण व्यवहार रद्द करावा, अशी विरोधकांची मागणी आहे. त्याचबरोबर विरोधकांचा आणखी एक प्रश्न आहे. तो म्हणजे आता ईडी आणि सीबीआय झोपलेत का?

पार्थ पवारांच्या कंपनीचा हा सगळा घोटाळा येतो तो महसूल विभागाशी संबंधित आहे. यासंदर्भात महसूलमंत्र्यांना गाठल्यावर महसूलमंत्र्यांनी हात वर केलेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी याचा संबंध आहे, त्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीही याबद्दल उत्तर देणं टाळलं आहे. माझ्याकडे मंत्री म्हणून माहिती आलेली नाही असं बावनकुळे म्हणाले आहेत. तर माहिती घेऊन बोलेन असं सुनिल तटकरे म्हणाले आहेत. कोरेगाव पार्कमधली ही जमीन पार्थ पवारांना फक्त 300 कोटींना दिल्यानंतर मोठं राजकीय वादळ उठलंय. त्यात आता मुख्यमंत्र्यांची एन्ट्रीही झाली आहे. त्यांनी अखेर योग्य ते चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं आहे.

पुणे जमीन गैरव्यवहारात पाणी मुरलंय आणि ते पार्थ पवारांच्या बाजूनं वळवण्यात आलंय, हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळेच कारवाईची चक्रं भराभर फिरलीयत. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय. पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारु यांना तत्काळ निलंबित करण्यात आलंय. फुटक मागू नका, असं शेतकऱ्यांना खडसावणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता मुलाला फुकट जमीन दिल्यावर काय प्रतिक्रिया देतात, याची सर्वाधिक उत्सुकता आहे.

Exit mobile version