शेतकरी उपोषणाच्या पवित्र्यात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकऱ्याच्या आजोबाने विकत घेतलेल्या 29 गुंठे जमिनीपैकी शून्य गुंठेदेखील जमीन शिल्लक राहिली नाही. त्यामुळे ही जमीन कुठे गेली, असा सवाल पेणमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे खारपाले येथील वयोवृध्द शेतकरी दामोदर ठाकूर, महिला शेतकरी अरुणा अरुण ठाकूर उपोषणाच्या पवित्र्यात आहेत. दिवाळीनंतर बुधवार, दि.29 ऑक्टोबर रोजी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा अरुण ठाकूर यांनी दिला असून, याबाबत निवेदन देण्यात आले.
अरुण ठाकूर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खार म्हैसबाड हद्दीतील स. नं. 67 ही शेतजमीन अरुण ठाकूर यांचे आजोबांनी 9 जून 1953 मध्ये गोवर्धन कानकिया यांच्याकडून कायम खरेदी खताने 29 गुंठे जमीन विकत घेतली होती. 1961मध्ये झालेली पोट हिस्सा मोजणी चुकीची असल्याचे ठाकूर यांनी पेण येथील भूमीअभिलेख व उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयांकडे तक्रार केली. मात्र, आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही. 2013मध्ये पनवेल-इंदापूर महामार्गासाठी उरलेली जमीन संपादित केली असून, 29 गुंठ्यांमधून शून्य गुंठे जमीन शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन झाले आहेत. कायम खरेदी खताने विकत घेतलेली जमीन कुठे गेली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. न्याय्य हक्कासाठी वयोवृध्द शेतकरी दामोदर ठाकूर, महिला शेतकरी अरुणा अरुण ठाकूर उपोषणाच्या पवित्र्यात आहेत. दिवाळीनंतर बुधवार, दि.29 ऑक्टोबरला अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा अरुण ठाकूर यांनी दिला आहे.
