मुलांच्या नावाने एक एकरची खरेदी
| रायगड | खास प्रतिनिधी |
सातत्याने नेहमीच वादात सापडणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यातच आता सत्तार यांच्या मुलांच्या नावाने अलिबाग तालुक्यातील थळ विभागात एक एकर जमीन घेतल्याचे उपलब्ध कागदपत्रावरुन उघड झाले आहे. सदरची जमीन खरेदी-विक्रीसाठी स्थानिक आमदारांनी त्यांना मदत केल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. सत्तार यांच्या प्रमाणे अन्य मंत्र्यांनी देखील अलिबाग तालुक्यात जमिनी घेतल्या आहेत, तर अन्य काही जमीनी घेण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जाते.
अलिबाग तालुका हा महानगराला अगदी खेटून असणारा तालुका आहे. याच तालुक्यातील थळ पासून मांडवा विभागात बिग शॉट लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी घेऊन तेथे टोलेजंग बंगले बांधले आहेत. त्यामध्ये क्रिकेटर, उद्योजक आणि सिनेजगतातील मान्यवरांचा समावेश आहे. हा ग्रामीण भाग असला तरी येथील जमिनींचे दर हे कोट्यवधी रुपयांच्या घरात आहेत. म्हणजेच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. सत्तार यांनी अलिबाग थळ येथे एक एकर बागायती जमीन जून-जुलै 2021 साली घेतल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते. 4 ऑगस्ट 2021 रोजी फेरफार क्रमांक 12809 नुसार सदरची जमीन अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर अब्दुल सत्तार आणि शेख अमीर अब्दुल सत्तार यांच्या नावावर झाल्याचे दिसून येते. सध्या बाजारमुल्यानुसार सदरच्या जमिनीची किंमत सव्वा दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. जमीन खरेदी करण्यासाठी स्थानिक आमदारांनी त्यांना मदत केल्याची चर्चा आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे इच्छुक आमदारांचे डोळे लागले आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यात राज्य सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव असण्याची शक्यता आहे. सत्तारांनी एवढी रक्कम कुठून उपलब्ध केली याबाबतही तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.