महसूलमंत्र्यांची विधानपरिषेदत माहिती
| मुंबई | प्रतिनिधी |
कोकणातील सर्व जिल्हयासह मुंबईतल्या कोळीवाडयातील जमिनी कोळी समाजाच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली आहे. याबाबतचा मुद्दा शेकापचे आ.जयंत पाटील यांनी उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले होते.
कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधदुर्ग या जिल्हयांसह मुंबईतल्या कोळीवाड्यातील जमिनी कोळी समाजाच्या नावावर करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी लेखी स्वरुपात विधान परिषदेत केली होती. त्या लेखी प्रश्नांवर विखे-पाटील यांनी म्हटले आहे की, मत्स्यव्यवसाय विभागाने कळविल्यानुसार रायगड, ठाणे ,पालघर, रत्नागिरी, सिंधदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये सागरी किनार्यालगत गावठाण परिसीमेतील घरांचे महास्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे सर्वे केला जात आहे. ते काम प्रगतीपथावर आहे. किनार्यालगत वसलेल्या मच्छीमार बांधवांच्या गावठाणातील मिळकतींच्या त्यांचे नावावर करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे महसूलमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुंबई शहर जिल्हयातील कोळीवाड्यांच्या सीमांकन हद्दीमध्ये समाविष्ठ मिळकतींच्या मिळकत पत्रिका मूळ भूमापनाच्या वेळी सर्वेक्षण झाले. त्यावेळी खाजगी व्यक्ति, संस्था, प्राधिकरण यांची नोंद दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील कोळीवाडयाच्या सीमांकनाची कार्यवाही भूमीअभिलेख विभागामार्फत करण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्हयातील कोळीवाडा सीमांकनामध्ये येत असलेल्या महानगरपालिका, म्हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, तटरक्षक दल, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प इत्यादी प्राधिकरणाच्या मिळकती व खाजगी मालकी असलेल्या मिळकती सीमाँकनात येत असल्यास त्याबाबत खात्री करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी मुंबई शहर यांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे असे विखे-पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले आहे .