गॅबियन स्ट्रक्चर ठरले कुचकामी
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर ते मिनी महाबळेश्वर कुडपण गावाच्या रस्त्यावर पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे दरड कोसळली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसात पोलादपूर ते कुडपण रस्त्यावर दरड कोसळून माती दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे. दरड रस्त्याच्या एका बाजूला असल्याने लहान वाहने याठिकाणाहून मार्गस्थ होत आहेत. मात्र, ज्या ठिकाणी गॅबियन स्ट्रक्चर उभारून डोंगर उतारावरील दगड व माती कोसळण्यास प्रतिबंध केला आहे, त्या गॅबियन स्ट्रक्चरच्या पुढील बाजूला हा दगडमातीचा ढिगारा कोसळल्याने तो बाजूला करणे गरजेचे बनले आहे.
पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे रस्ता आणि संरक्षण भिंती उभारण्यासह गॅबियन स्ट्रक्चर उभारून डोंगरातून दगड मातीचे ढिगारे कोसळणे प्रतिबंधित करण्यात आले. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून कुडपणच्या रस्त्यावर लालमाती आणि दगडांचे ढिगारे कोसळण्याचे सातत्य कायम राहिले आहे. रविवारी कोसळलेल्या दरडीचे ठिकाण गॅबियन स्ट्रक्चरलगत असल्याने या गॅबियन स्ट्रक्चरचे काम कुचकामी ठरल्याची चर्चा होत आहे.
पोलादपूर तालुक्यातील बहुतांशी गावे डोंगर माथ्यावर असल्याने येथे जाणारे रस्तेदेखील डोंगरातून किंवा डोंगर फोडून काढण्यात आले आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे या रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे सत्र सुरू होते. गेल्या शनिवार-रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने पोलादपूर शहरासह ग्रामीण भागातील तालुक्यात हजेरी लावली असून, रविवारी 107 मि.मी. नोंद करण्यात आली आहे. सोमवारी पावसाची नोंद 29 मि.मी. झाली असून, तालुक्यात आजपर्यंत 779 मि.मी. नोंद आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर कुडपण येथे अतिवृष्टी, भूस्खलन अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास सदरची माहिती ग्रामस्थांकडून मुंबईस्थित नितेश शेलार यांना ग्रामस्थांकडून कळविली जाते आणि त्यानंतर नितेश शेलार यांच्याकडून तालुक्यातील पत्रकार व आपत्ती निवारण कक्षाला दिली जात असल्याने प्रशासनाला दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी आपत्ती निवारणाच्या कक्षामधून दरड हटविण्यासाठी जेसीबी घटनास्थळी पाठवून दरड हटविण्यात आली.